औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणून तोडली, बजरंग दलाचा आक्रमक पावित्रा
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात राज्यात वातावरण तापले आहे. बजरंग दलाने कोल्हापुरात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तोडली. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनामुळे राज्यात तणाव आहे. मालेगावमध्येही अशाच स्वरूपाचे आंदोलन झाले.

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला होता. त्यातच आता कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक झाले आहे. बजरंग दलाने औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणून ती तोडली. यामुळे कोल्हापुरातील वातावरण तापले आहे.
कोल्हापुरात सध्या बजरंग दलाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बजरंग दलाने कोल्हापुरात आंदोलन केले. या आंदोलनावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणली. एका टेम्पोमध्ये ही प्रतिकात्मक कबर ठेवण्यात आली. त्यासोबत औरंगजेबाचा फोटोही ठेवण्यात आला होता. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या प्रतिकात्मक कबरीवर दगड फेकले. तसेच औरंगजेबाचा फोटोही फेकण्यात आला.
यावेळी पोलिसांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले. राज्यभरात आज बजरंग दलाकडून आंदोलन केले जात आहे. यात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तोडावी, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाणार होते. पहिल्यांदा जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली. यानतंर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तोडण्यात आली.
मालेगावात बजरंग दल आक्रमक
यासोबतच मालेगावातही आंदोलन करण्यात आले. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना छळ करून मारले, हिंदूचे देवदेवतांची मंदिरे तोडली, हिंदू महिलांवर अत्याचार करत अनन्वित छळ केला अशा क्रूरकर्मा औरंगजेबची कबर महाराष्ट्र सरकारने तातडीने हटवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या वतीने मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जयघोष करत औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी अशा घोषणा देण्यात आल्या. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला यावेळी निवेदन देण्यात आले. दरम्यान, औरंगजेब व अफजलखान यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांची यावेळी निषेध करण्यात आला.
नागपुरातही आंदोलन
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना शांततेच आवाहन करण्यात आलं आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकूरवाड यांनी दिली. तर नागपुरातही औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी बजरंग दलाने आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी महाल परिसरात आंदोलन करण्यात आले.