पोलीस अधिकारी म्हणाला पत्रकार परिषद घेतली तर चड्डी राहणार नाही, खासदार बजरंग सोनवणेंचं ओपन चॅलेंज म्हणाले…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात सुरुवातीपासूनच बजरंग सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहेत. या प्रकरणात सुरुवातीपासूनच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात त्यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. मी जर पत्रकार परिषद घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही, असं वक्तव्य एका पोलीस अधिकाऱ्यानं केलं होतं, आता या अधिकाऱ्यांना बजरंग सोनवणे यांनी ओपन चॅलेंज केलं आहे. ते पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले बजरंग सोनवणे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी लावली पण त्यातले अधिकारी कोण आहेत? त्यांना खुर्चीवर कोणी बसवलंय? हे पण तपासायला पाहिजे. सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये नेमण्यात आले आहेत. देशपांडे नावाचे सरकारी वकील केस घ्यायला घाबरले कारण यांची दादागिरी गुंडगिरी आणि दडपशाही, काल एक अधिकारी म्हणाला की जर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझी चड्डी राहणार नाही, माझी विनम्र विनंती आहे की तू एकदा प्रेस घेच, तुला विविध ठिकाणी पोस्टिंग मिळण्याबाबत कोणाची मेहरबानी आहे, येणाऱ्या दोन दिवसांमध्ये समजून जाईल, असं सोनवणे यांनी म्हटलं आहे.
नऊ तारखेला अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा, जातीचा नाही. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. सरकारला जोपर्यंत फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही, तोपर्यंत मोर्चे सुरू राहणार. बीडमध्ये आता जीवन जगणं अवघड झालं आहे. या हत्यामागे जो मास्टरमाईंड आहे, त्याला पहिल्यांदा पकडा तो खंडणीखोर आहे. मी राजकारण करायला या मोर्चामध्ये सहभागी झालो नाही. सरेंडर झालेला आरोपी नेमका पकडला की सरेंडर झाला? असा सवालही यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. एवढ्या दिवसांमध्ये कोण कोणाला भेटला? कोणी कोणाची मदत केली, त्या सर्वांना सहआरोपी करा अशी मागणी देखील सोनवणे यांनी केली आहे.