‘या सगळ्या गोष्टीमागे…’; दिशा सालियन प्रकरणावर थोरातांची पहिली प्रतिक्रिया
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे. यावर आता बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणावर आता काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले थोरात?
2014 पासून देशात आरोपांच्या दबावाचं राजकारण सुरू आहे. या सगळ्या गोष्टीमागे राजकारण असण्याची शक्यता आहे. दबाव तंत्राचा हा एक भाग असू शकतो, हे मला माझ्या अनुभवावरून वाटतं असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
सोमवारी नागपुरात मोठा राडा झाला. दोन गट आमने-सामने आले. दगडफेक आणि जाळपोळ झाली. या घटनेमध्ये काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. यावर देखील बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे प्रत्येक देश विकासासाठी धडपड करतोय, आम्ही मात्र इतिहासात जाऊन जुन्या कबरी उचकत आहोत. जातीभेद धर्मभेद आपल्याला मागे घेऊन जात आहे. हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. परभणी, बीड व आता नागपूरमध्ये देखील अशा घटना घडत आहेत, असा हल्लाबोल थोरात यांनी केला आहे.
दरम्यान लाडकी बहीण योजनेवरू देखील त्यांनी निशाणा साधला. हे कशामुळे होत आहे, याचा अर्थखात्यानं शोध घेतला पाहिजे. आज निराधारांना अनेक महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. एका म्यानात तीन जण अशी ही सरकारची अवस्था आहे. सगळ्यांच्या मनात अस्वस्थता दिसत आहे. ते सत्तेचा आनंद घेत आहे, मात्र जनता अडचणीत आहे, असं थोरात यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अर्थसंकल्पाच्या अनेक आठवणी आहेत. प्रत्येक अर्थसंकल्प हा वेगळं काहीतरी सांगत असतो. प्रत्येक काळातील परिस्थिती पाहून अर्थसंकल्प मांडले जातात. यावेळी मी सभागृहात नव्हतो, तरीसुद्धा माझं बारीक लक्ष होतं. या वेळचा अर्थसंकल्प म्हणजे त्याचं पोकळ स्वरुप होतं. माझ्या चाळीस वर्षात सुशील कुमार शिंदे यांनी मांडलेला अर्थसंकल्प आजही आठवतो. सर्वसामान्य माणसाला घटकाला त्यातून न्याय मिळाला होता, त्यामुळे तो आजही आठवतो, असंही यावेळी थोरात यांनी म्हटलं आहे.