Ban on open tourist spots | नाशिकमध्ये खुल्या पर्यटन स्थळांवर बंदी; कोठे जाणे ठरेल धोक्याचे?
नाशिकमधील खुल्या पर्यटन स्थळांवर गर्दी केल्यास कारवाईच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, याने काहीही साध्य होणार नाही. कारण बहुतांश येणारे पर्यटक हे बाहेरचे असतात. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक, खासगी वाहनस्थळे, विमानतळ आदी ठिकाणांच्या बाहेर तसे फलक लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
नाशिकः नाशिकमध्ये अतिशय झपाट्याने वाढणारे कोरोना (Corona) रुग्ण, सरकार दरबारी कोरोना रुग्णांची कमी झालेली नोंद, नागरिकांनी लसीकरणाकडे फिरवलेली पाठ, कोरोनाचे पायदळी तुडवले जाणारे निर्बंध हे सारे पाहता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील खुल्या पर्यटन स्थळांवर (open tourist spots) बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या पर्यटन स्थळांवर बंदी घालावी, अशी सूचना यापूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती.
या ठिकाणी बंदी
नाशिक पर्यटनासाठी तर प्रसिद्ध आहेच. सोबत अनेक धार्मिक विधीसाठी देशभरातील नागरिक नाशिक गाठतात. रामकुंड आणि गोदातीरावरील परिसरात त्यांची गर्दी होते. नदीकाठावर विविध धार्मिक विधी सुरू असतात. मात्र, कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता आता या खुल्या पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. सोबतच आता या विधींना किती लोकांनी उपस्थित रहावे, याची मर्यादा निश्चित केली जाणार असल्याचे समजते. शहरातील सर्व पर्यटन स्थळांवरील गर्दी तातडीने कमी व्हावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले असून, आता अंजनेरी गढ, ब्रह्मगिरी, पांडवलेणी, चांभर लेणी, रामशेज, पहिने, भावली धरण या ठिकाणी बंदी असणार आहे. नाशिकमध्ये सध्या या काही पर्यटन स्थळांची नावे बंदी म्हणून सांगण्यात येत आहेत. मात्र, या यादीमध्ये वाढही होऊ शकते.
हे करावे लागेल
नाशिकमधील खुल्या पर्यटन स्थळांवर गर्दी केल्यास कारवाईच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, याने काहीही साध्य होणार नाही. कारण बहुतांश येणारे पर्यटक हे बाहेरचे असतात. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक, खासगी वाहनस्थळे, विमानतळ आदी ठिकाणांच्या बाहेर तसे फलक लावण्याची गरज आहे. कारण या पर्यटकांवर कारवाई केली, तर त्याचा मनस्ताप त्यांना होईलच. विशेष म्हणजे त्यांना नियम तरी माहिती असले पाहिजेत. त्यामुळे प्रशासनाचा ताणही कमी होईल. मात्र, शहरात प्रचंड गर्दी होत असताना, खुल्या पर्यटन स्थळांबर बंदी घालून काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येथे असेल बंदी
– अंजनेरी गढ
– ब्रह्मगिरी
– पांडवलेणी
– चांभर लेणी
– रामशेज
– पहिने
– भावली धरण
इतर बातम्याः
Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?
Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन