जगप्रसिद्ध असलेल्या रायगडमधील कुंडलिका नदीवरील राफ्टिंगवर बंदी
रायगड जिल्ह्यातील सुतारवाडीतील साजे रवाळजे व कामत याठिकाणी राफ्टिंग चालते, नजीकच्या 6 गावातील ग्रामस्थ, तरुण याच रिव्हर राफ्टिंग व्यवसायावर अवलंबून आहेत. राफ्टिंग बंदी आणल्याने इथला व्यवसायीक संकटात आलाय
रायगड : ऐन हंगामात रायगडमधील(Raigad) कुंडलिका नदीवरील(Kundlika river) राफ्टिंगवर बंदी(Ban on rafting ) घालण्यात आलेय. यामुळे पर्यटकांनी येथील पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली आहे. यामुळे स्थानिक व्यवसायीकांवर संकट ओढवले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. रिव्हर राफ्टिंग व्यवसायावर आधारित लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. स्थानिकांवर उपासमारीचे संकट आलेय, राफ्टिंग सुरू करा, अन्यथा व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन छेडू असे म्हणत स्थानिक आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड इथली वर्षाचे 12 ही महिने चालणारी कुंडलिका नदीवरील राफ्टिंग जगप्रसिद्ध आहे. 2003 साली निसर्गाच्या सानिध्यातील , नदीच्या खळखळणाऱ्या निथळ पाण्यावर सुरू झालेली ही सर्वात सुरक्षित राफ्टिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण व पर्वणी ठरतेय. पर्यटनावर आधारित रोजगाराला यातून चालना मिळतेय.
रिव्हर राफ्टिंगचा साहसी खेळ व थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येथे दैनंदिन येतात. मौजमस्ती करतात, सुट्टीच्या दिवसात तर इथल्या स्थानिक व्यवसायांना दुपटीने उभारी मिळते. पर्यटनावर आधारित रोजगाराला यातून चालना मिळतेय. मात्र आजमितीस ऐन हंगामात येथील राफ्टिंगवर बंदी आणलीय. काही मोजक्या लोकांच्या आडमुठे धोरणामुळे राफ्टिंग व्यवसाय बंद पडलाय.
रायगड जिल्ह्यातील सुतारवाडीतील साजे रवाळजे व कामत याठिकाणी राफ्टिंग चालते, नजीकच्या 6 गावातील ग्रामस्थ, तरुण याच रिव्हर राफ्टिंग व्यवसायावर अवलंबून आहेत. राफ्टिंग बंदी आणल्याने इथला व्यवसायीक संकटात आलाय. पर्यटकांचे खास आकर्षण हे राफ्टिंग असून राफ्टिंगवरच बंदी असल्याने नाराज झालेल्या पर्यटकांनी रिव्हर राफ्टिंगक्षेत्र व नजीकच्या पर्यटनस्थळांकडे अक्षरश: पाठ फिरवलीय, राफ्टिंग बंद असल्याने एकूणच पर्यटकांची संख्या रोडावलीय. पर्यटक नाराज होऊन परत जात आहेत.
रोजगार बंद झाल्याने सणासुदीच्या दिवसात मुलांना कपडे घ्यायचीही ऐपत राहिली नसल्याची कैफियत इथल्या स्थानिक व्यवसायीकांनी मांडली आहे. रिक्षाचे हप्ते, राफ्टिंग साहित्य खरेदीसाठी घेतलेले कर्ज फेडावे कसे असा प्रश्न अनेकांना सतावतोय, पर्यटक आलेच नाहीत तर कुणाच्याही हाताला काम नाही, तर कमाई नसल्याने कुटुंबाचे पालन पोषण, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झालाय. राफ्टिंग सुरू झाली नाही तर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी चिंता राफ्टिंग क्षेत्र परिसरातील लहान मोठ्या व्यवसायीकांनी व्यक्त केलीय.
शासनाची ई निविदा प्रक्रिया पूर्ण करून कोलाड रिव्हर राफ्टिंग एल एल पी यांना ठेका मिळाला असूनही काम करू दिले जात नाहीये, या ना त्या कारणाने अडवणूक केली जातेय. हे कुठं तरी थांबले पाहिजे, अशी मागणी रिव्हर राफ्टिंगचे ठेकेदार यांनी केलीय.
राफ्टिंग व्यवसाय सुरू करून स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा , अन्यथा व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन छेडू असा इशारा साजे , रवाळजे विभागातील स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा चालक, व्यवसायीक यांनी प्रशासनाला दिलाय.