Akshay Shinde Encounter : ‘बदला पुरा’.. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, मविआला डिवचलं
एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे फोटो बॅनरवर असून फरक स्पष्ट आहे म्हणत महाविकास आघाडीला बॅनरमधून डिवचले आहे. त्यामुळे येत्या काळात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा हा मुद्दा आणखी जास्त पेटण्याची शक्यता आहे.
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी मृत्यू झाला. पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी लागून तो ठार झाला. या घटनेवरून आता राज्यभरात वातावरण तापलंय. अत्याचाराच्या घटनेतील आरोपी मेल्याने सर्वसामान्य नागरिक आनंद व्यक्त करत असतानाच विरोधकांनी मात्र या प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. हे एन्काऊंटर की पूर्वनियोजित हत्या असे म्हणत विरोधकांनी सरकारवर अनेक प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. शरद पवार, संजय राऊत, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, यांसारख्या अनेक नेत्यांनी या मुद्यावरून सरकारवर टीका केली आहे.
मात्र दुसरीकडे महायुतीचे नेते, भाजप , शिंदे गटातील नेते मात्र या घटनेप्रकरणी प्रतिक्रिया देताना विरोधकांवरच टीका केली. अत्याच्याराच्या घटनेतील आरोपीचा खात्मा झाल्यावर विरोधकांच्या पोटात का दुखतंय, असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. दरम्यान आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरवॉर रंगलं आहे. “महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार” असा उल्लेख बॅनरवर असून त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही झळकतोय. एवढंच नव्हे तर या बॅनर्समधून मविआला देखील डिवचण्यात आलं असून ‘पोलिसांकडून वसूली करणार सरकार’ असाही उल्लेख काही बॅनर्सवर आहे. यामुळे आता नवा वाद सुरू पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.
एन्काउंटर नंतर मुंबईत बॅनरवॉर
मुंबईतील अनेक भागात हे बॅनर्स सध्या झळकत आहेत. ‘बदला पुरा’, “महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार” असा आशय असलेले अनेक बॅनर्स सध्या शहरात दिसत असून वांद्रे येथील कलानगरमध्येही ते झळकत आहेत. या बॅनर्सवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत असून त्यांच्या हातात बंदूकही आहे.
तसेच “अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस कोण? एंकाऊंटर फेम प्रदिप शर्माबरोबर केलं होतं काम” असा आशय असलेले हे निनावी बॅनर्स चर्चेचा विषय छरे आहेत.
मविआला डिवचलं
या बॅनर्समधून फक्त देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं नाही तर महाविकास आघाडीला देखील डिवचण्यात आलं आहे. गोरेगाव येथे लावण्यात आलेल्या काही बॅनरवरून तर मविआवर टीका करण्यात आली आहे. ‘ मविआच्या काळात पोलीस सरकारसाठी वसूली करायचे, पण महायुतीच्या काळात पोलीस सरकारसाठी हिशोब करणार’ अशा आशयाचे बॅनर्स लागले आहेत.
एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे फोटो बॅनरवर असून फरक स्पष्ट आहे म्हणत महाविकास आघाडीला बॅनरमधून डिवचले आहे. त्यामुळे येत्या काळात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा हा मुद्दा आणखी जास्त पेटण्याची शक्यता आहे.