बीडमध्ये आणखी एक हत्याकांड, दोन भावांची निर्घृण हत्या; 6 जणांवर मकोका
बीड जिल्ह्यात घडलेल्या निर्घृण हत्याकांडात दोन भावांचा खून झाला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीने बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे केले आहेत.

बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने उलटले आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच बीडमधील खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. आता बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर आता आणखी एका सहा जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टोळीत तीन महिलांचाही समावेश आहे.
दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे, मुद्दसर मन्सुर पठाण, सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले, शशिकला दीपक भोसले आणि संध्या कोहीनुर भोसले, अशी मकोका लावण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या सर्वांचा टोळीत समावेश आहे. या टोळीने बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे केले आहेत.
सहा आरोपींना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी वाहिरा ते पिंपळगाव रोडवरील गायरान जमिनीत या आरोपींनी आजिनाथ विलास भोसले आणि भरत विलास भोसले या दोघांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अजून तीन जण फरार आहेत.
गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार
या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, पुरावे नष्ट करणे, रस्ता अडवणे अशा स्वरूपाचे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतला. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.