“सारखं परळी परळी करु नका…” पंकजा मुंडेंनी फटकारलं, म्हणाल्या “थेट फाशीची शिक्षा…”
बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. सरपंच हत्याप्रकरण आणि इतर घटनांवरून अजित पवार आणि पंकजा मुंडे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा हवी असल्याचे म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. यासोबत गेल्या काही दिवसांपासून बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. बीडमधील अनेक जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. “जर कोणी खंडणी मागितली तर त्यांची गया केली जाणार नाही. जर कुणी खंडणी मागितली तर, मी त्याला मकोका लावायला मागे-पुढे पाहणार नाही”, असे अजित पवार म्हणाले होते. आता यावर पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे यांनीही भाष्य केले आहे.
पंकजा मुंडे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीड आणि परळीतील घटनांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेट विधान केले. “या घटना सर्वच ठिकाणी घडत आहेत. परळी परळी करु नका. तुमचा फोकस परळीकडे आहे. यात जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
कुठेही अशाप्रकारची घटना घडणं चूक
“या घटना होऊ नयेत. ही एक प्रवृत्ती आहे. परळी परळी करु नका. प्रत्येक ठिकाणी घटना घडत आहेत. तुमचा फोकस परळीकडे आहे. घटना सर्व ठिकाणी घडत आहेत. माझ्याकडे माहिती आलेली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या जिल्ह्यात काय घडत आहे, याची संपूर्ण माहिती आहे. कुठेही अशाप्रकारची घटना घडणं चूक आहे. या घटना घडणं चुकीच्या आहेत. यात जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांना पकडायला हवं”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“आपण हा प्रश्न मार्गी लावू”
“या जिल्ह्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक आहेत, असे अजित दादांनी सांगितलं. पण एखाद्या घटनेमुळे किंवा दुर्देवी प्रसंगामुळे आपल्या जिल्ह्याची प्रतिमा डागळायला नको. ते उद्योग दूर जायला नको. मी पालकमंत्री असल्यापासून इथे विमानतळ व्हावं यासाठी मीदेखील प्रयत्न करत होते. पण जेव्हा शासनाने शासकीय जागा हवी असा निर्णय घेतला आणि तेवढी शासकीय जागा एकाच ठिकाणी मिळणं हा प्रश्न होता. तो प्रश्न कसा सोडवायचा असे अजित दादांना विचारले. त्यावर त्यांनी आपण हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले”, असेही पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटले.
“माझ्या स्वागतासाठी जेसीबी लावू नका”
यानंतर पंकजा मुडेंनी सर्व कार्यकर्त्यांना एक विनम्र आवाहन केले. “माझ्या स्वागतासाठी जेसीबी लावू नका. गुलाबाचं फूल देऊन स्वागत करा. फटाकेही फोडू नका, फटाक्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.