बीडः जिल्ह्यातील केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा (Namita Mandada) यांच्यासोबत सेल्फीचा आग्रह केलेल्या व्यक्तीला मुंदडा यांच्या सासऱ्यांनी बेदम मारहाण (Beed Crime) केली आहे. नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा (Nandkishor Mundada) यांनी या व्यक्तीला शिवीगाळ करत धक्का-बुक्की करत काठीनेही मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वीच नमिता मुंदडा यांनी बीडमध्ये गुंडांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही, अशी लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत झालेल्या एका घटनेचा आपबिती सांगितली होती. त्यानंतर आज नमिता मुंदडा सासरे यांनीच सदर घटनेतील व्यक्तीला मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे.
नमिता मुंदडा यांनी सांगितल्याप्रमाणे, बीडमधील त्यांच्या घरासमोरील रसवंती गृहात त्या त्यांच्या दोन वर्षाच्या मुलासोबत रस प्यायला गेल्या होत्या. समोरील एका ढाब्यावर खुलेआम दारुविक्री सुरु होती. तेथून रस्ता क्रॉस करून तिघे जण आले. त्यांनी नमिता मुंदडा यांच्यासोबत फोटो काढायचा आग्रह धरला. तिथे दारुच्या बाटल्या होत्या. मला फोटो काढायचा नाही, असं सांगतल्यानंतर त्यांनी ढकलाढकली केली. मोठा गोंधळ घातला. नमिता मुंदडा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याविरोधात पोलिसात तक्रार करूनही आरोपींना पकडण्यात आलं नाही. आरोपींना आमच्या गाड्यांत टाकून पोलीस स्टेशनला नेलं, पण पोलिसांची काहीच कारवाई झाली नाही,मी लक्षवेधी मांडली तेव्हा पोलिसांवर कारवाई करण्यात आली, अशी तक्रार नमिता मुंदडानी केली होती. एक आमदार असून मला सुरक्षितता नाही तर सामान्य महिलांचं काय, असा प्रश्न नमिता मुंदडा यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आमदार नमिता मुंदडा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याविरोधात लक्षवेधी सूचनाही दाखल केली होती. मात्र आता नमिता मुंदडा यांच्या सासऱ्यांचाच असा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न बीडकरांकडून विचारला जात आहे.
इतर बातम्या-