गडचिरोलीतून आलोय, बॉम्ब आणि हत्यारं तुझ्या घरात ठेवून… खोक्या भोसलेला वन अधिकाऱ्याची धमकी
बीड जिल्ह्यातील वन विभागाच्या कोठडीत असलेल्या सतीश भोसले यांना वन अधिकारी अमोल गरकळ यांनी मारहाण केल्याचा आणि धमक्या दिल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. वकील अंकुश कांबळे यांच्या मते, गरकळ यांनी सीसीटीव्ही बंद करून भोसले यांना मारहाण केली.

बीड जिल्ह्यात वनविभागाच्या कोठडीत खोक्या उर्फ सतीश भोसलेला मारहाण करण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला होता. खोक्या भोसलेला वन विभागाच्या ताब्यात असताना मारहाण झाली नसल्याचं वन विभागाने सांगितले आहे. वन विभागाच्या ताब्यात असताना सतीश भोसलेला मारहाण झालीच नाही, असं निरीक्षण वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयानं नोंदवलं. आता याप्रकरणी आणखी एक मोठा खळबळजनक दावा सतीश भोसलेच्या वकिलांनी केला आहे. वन विभागाच्या कोठडीत असलेल्या सतीश भोसले याला एका वन अधिकाऱ्याने गंभीर धमकी दिल्याचा दावा त्याचे वकील अॅड. अंकुश कांबळे यांनी केला आहे. ते शिरूर कासार येथील न्यायालयात पत्रकारांशी बोलत होते.
अॅड.अंकुश कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या कोठडीत असताना सतीश भोसलेला अमोल गरकळ नावाच्या वन अधिकाऱ्याने कार्यालयात नेले. यानंतर कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवले. त्याने सीसीटीव्ही फुटेज बंद करून गरकळ यांनी भोसले यांना पाठीवर, गालावर आणि मांडीवर अमानुष मारहाण केली, असे सतीश भोसलेने सांगितले.या मारहाणीनंतर हा विषय न्यायालयात मांडण्यात आला. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत सतीश भोसले याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
सतीश भोसलेला धमकीही
हा वन अधिकारी सतीश भोसले यांच्या आडून येथील आदिवासी आणि भटक्या विमुक्त जमातींमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या अधिकाऱ्याने सतीश भोसलेला धमकीही दिली होती. मी गडचिरोली येथे नोकरी करून आलो आहे. माझ्याकडे अनेक बॉम्ब आणि हत्यारे आहेत. ही हत्यारे तुझ्या घरात ठेवून त्याला गुन्हेगार ठरवले जाईल, असेही धमकावण्यात आले. वन विभागातील हा अधिकारी कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सर्व कटकारस्थान करत असल्याचा आरोप अॅड. अंकुश कांबळे यांनी केला आहे.
संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा
केवळ राजकीय सूड घेण्यासाठी हा अधिकारी वागत असल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात बोलताना या वन अधिकाऱ्याच्या विरोधात ते लवकरच रितसर तक्रार दाखल करणार आहेत. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.