बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा मुंडेंच्याच तालमीत तयार झालेला उमेदवार
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने बीडच्या जागेसाठी नवख्या उमेदवाराला संधी दिले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत विश्वासातील मानले जाणारे बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. भाजपकडून डॉ. प्रितम मुंडेंचं राष्ट्रवादीसमोर आव्हान असेल. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेलाच उमेदवार मुंडेंविरोधात उतरवलाय. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये […]
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने बीडच्या जागेसाठी नवख्या उमेदवाराला संधी दिले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत विश्वासातील मानले जाणारे बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. भाजपकडून डॉ. प्रितम मुंडेंचं राष्ट्रवादीसमोर आव्हान असेल. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेलाच उमेदवार मुंडेंविरोधात उतरवलाय.
बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे असे चेहरे आहेत, ज्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात गोपीनाथ मुंडे यांच्यापासून झाली. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून वेगळं होत या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. त्यामुळेच बीड लोकसभेचा इतिहासही रंजक आहे. यात सर्वात रंजक गोष्ट म्हणजे जो उमेदवार लोकसभेला मुंडेंविरोधात लढला, तो पुढच्या काही दिवसातच भाजपात आलाय. गेल्या दोन टर्मपासूनचा हा ट्रेंड पाहायला मिळतो.
मुंडेंविरुद्ध निवडणूक लढलेला उमेदवार निवडणुकीनंतर भाजपात
2009 च्या लोकसभेला भाजपकडून गोपीनाथ मुंडे उमेदवार होते, तर राष्ट्रवादीकडून रमेश आडसकर यांना उमेदवारी होती. आडसकर हे देखील गोपीनाथ मुंडे यांच्याच तालमीत तयार झालेले नेते. पण राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि गोपीनाथ मुंडेंविरुद्ध दंड थोपटले. या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विजय झाला. निवडणुकीनंतर रमेश आडसकर पुन्हा एकदा भाजपात परतले.
2014 ला मोदी लाट होती. या निवडणुकीतही पुन्हा एकदा 2009 ची पुनरावृत्ती घडली. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री सुरेश धस यांना संधी देण्यात आली. बीडची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी नेहमीच प्रतिष्ठेची असते. त्यामुळे सुरेश धस यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि अजित पवार बीडमध्ये तळ ठोकून होते. पण गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या फरकाने सुरेश धस यांचा पराभव केला. 3 जून 2014 ला गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांची कन्या प्रितम मुंडे खासदार झाल्या. काही महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांवेळी सुरेश धस यांनी जाहीरपणे भाजपला मदत केली आणि यानंतर ते भाजपचे आमदार बनले.
मुंडेंच्या तालमीत तयार झालेले राष्ट्रवादीचे नेते
राष्ट्रवादी आणि काँग्रेसची 2014 च्या अगोदर राज्यात 15 वर्षे सत्ता होती. या काळात राष्ट्रवादीचा विस्तार गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात झाला. पण गोपीनाथ मुंडे यांच्याच सहकाऱ्यांना फोडून राष्ट्रवादीने विस्तार केला. यामध्ये गोपीनाथ मुंडेंचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जाणारे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचंही नाव आहे. 2009 ला भाजपचे आमदार असणाऱ्या अमरसिंह पंडितांनी नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेवराई मतदारसंघात पंडित यांची पकड आहे. 2004 ला ते भाजपच्या तिकिटावर आमदार झाले होते.
गेवराईपासूनच सुरुवात करायची झाल्यास बदामराव पंडित यांचंही नाव येतं. बदामराव पंडित आणि गोपीनाथ मुंडे अगोदर एकत्र होते. पण नंतर बदामराव पंडितांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2009 ला बदामराव पंडित राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले. पण 2014 ला त्यांचा भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी विक्रमी मतांनी पराभव केला.
माजलगावचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके हे दोन वेळा भाजपच्या तिकिटावर आमदार होते. 1999 आणि 2004 ची आमदारकी त्यांनी भाजपच्या तिकिटावर मिळवली. पण नंतर गोपीनाथ मुंडेंना सोडून ते राष्ट्रवादीत गेले. 2009 ला ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले. राष्ट्रवादीने त्यांना मंत्रीपदाचीही जबाबदारी दिली होती. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंकेंचा भाजपच्या आर. टी. लक्ष्मण यांनी पराभव केला.
गोपीनाथ मुंडेंसोबत काम केलेल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये विमलताई मुंदडा यांचंही नाव येतं. 1995 ला युती सरकार आलं तेव्हा त्या भाजपच्या तिकिटावर आमदार होत्या. पण 1999 ला त्यांनी भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्या अनेकदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्या.
पुन्हा एकदा मुंडेंच्या तालमीतला उमेदवार मुंडेंविरोधातच
राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या बजरंग सोनवणेंची राजकीय कारकीर्द दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच सुरु झाली होती. गोपीनाथ मुंडेंनीच पहिल्यांदाच सोनवणेंना जिल्हा परिषदेवर नेलं. त्यानंतर त्यांचं सक्रिय राजकारण सुरु झालं. पण धनंजय मुंडेंनी जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांनंतर त्यांच्यासोबतच बजरंग सोनवणेंनीही राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला. त्यामुळेच सोनवणे हे धनंजय मुंडेंचे विश्वासू मानले जातात.
बीड जिल्हा आणि गोपीनाथ मुंडेंचे समीकरण जुनंच आहे. राष्ट्रवादीचीची स्थापना होण्याआधी बीड जिल्हा कधीकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा. मात्र याच काँग्रेसला गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची शक्ती पणाला लावत काँग्रेस विरोधी अनेक मातब्बर उभे केले. अमरसिंह पंडित, उषा दराडे, सुरेश धस, प्रकाश सोळंके हे त्याकाळचे मुंडेंचे बुरूज होते. मात्र काळ बदलला आणि काँग्रेसपासून राष्ट्रवादी वेगळी झाली आणि हे लोक गोपीनाथ मुंडे यांच्यापासून दूर झाले. काळ जसा निसटत गेला तसाच गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्याच बाळकडू लाभलेल्या लोकांनी राष्ट्रवादी सोबत मित्रत्व केलं.