संतोष देशमुख हत्याप्रकरणात CID चे 9 पथक तैनात, या दोन राज्यातही आरोपींचा तपास, वाल्मिक कराडच्या शोधासाठी इतक्या जणांची चौकशी
Santosh Deshmukh Case Valmik Karad : संतोष देशमुख हत्याप्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग ॲक्टिव मोडवर आला आहे. गेल्या 22 दिवसांपासून तीन आरोपी हाती लागलेले नाहीत. परिणामी पोलिस आणि सीआयडीची नाचक्की झाली आहे. पथकाने या दोन राज्यातही आरोपींचा तपास सुरू केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग (CID) ॲक्टिव मोडवर दिसत आहे. गेल्या 22 दिवसांपासून तीन आरोपींचा छडा लावण्यात अपयश आल्याने पोलिस आणि सीआयडीची नाचक्की झाली आहे. हत्याप्रकरणात चार आरोपी अटकेत आहेत. तर इतर तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सीआयडीने कंबर कसली आहे. सकाळीच तीन पथकं पुण्यातून या तपासकामी रवाना करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.
CID चे 9 पथक तैनात
सरपंच संतोष देशमुख हत्येला आज 22 दिवस पूर्ण झाले आहेत. प्रकरणात केवळ चार आरोपी अटकेत आहेत. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींच्या शोधात CID चे 9 पथक तैनात केली आहे. या पथकात 150 अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर सकाळी पुण्यातून तीन पथकं ही तपासासाठी रवाना करण्यात आल्याचे समोर येत आहे.
या राज्यातही आरोपींचा तपास
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख खून प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. पुण्यातून पहाटे सीआयडीचे तीन पथके आरोपींच्या तपाससाठी रवाना करण्यात आली आहे. सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यातील सीआयडी मुख्यालयात दाखल झाले. पण प्रशांत बोरुडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान आरोपींचा तपास करण्यासाठी दोन पथके केरळ, कर्नाटकात रवाना करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड अद्याप फरार आहे. तर काही जण तो लवकरच शरण येण्याची अथवा त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवत आहेत. वाल्मीक कराड याच्या संपर्कातील 145 जणांची चौकशी सुरू आहे. बीड येथे CID चे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही चौकशी केली आहे.
धनंजय देशमुख अंतरवली सराटीकडे रवाना
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अंतरवली सराटीकडे रवाना झाल आहेत. ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात दोघांची भेट होणार आहे. धनंजय देशमुख आणि जरांगे पाटील यांच्यात महत्वाची चर्चा होणार असल्याचे कळते. CID चौकशी नंतर धनंजय देशमुख जरांगे यांच्या भेटीला पोहचले आहेत.