Santosh Deshmukh Case : आरोपींना फासावर लटकवा, धाराशिवमध्ये आज जनसागर उसळणार, जन आक्रोश मोर्चा तोडणार रेकॉर्ड
Santosh Deshmukh Case Dharashiv Jan Akrosh Morcha : संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला आहे. याप्रकरणात एक आरोपी अद्याप फरार आहेत. तर अनेक प्रश्न अजून गुलदस्त्यात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या निर्घृण खून प्रकरणात जन आक्रोश मोर्चा निघत आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. याप्रकरणात कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तर अनेक प्रश्न अजून गुलदस्त्यात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या निर्घृण खून प्रकरणात जन आक्रोश मोर्चा निघत आहे. संतोष देशमुख यांच्या खुन्यांना फासावर लटकवा आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये थोड्याच वेळात जन आक्रोश मोर्चा निघत आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, आमदार सुरेश धस, छत्रपती संभाजीराजे, मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपस्थित असतील.
धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चाची धग
आज धाराशिव येथे संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी त्यांना न्याय द्या या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा निघत आहे. धाराशिव येथील मोर्चासाठी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्यासह बहीण प्रियंका चौधरी उपस्थित असतील. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. धाराशिव शहरात आज निघणाऱ्या जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरांमधील वाहतूक व्यवस्था, मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्व नागरिक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय तसेच आधी सुविधा असतील. मोर्चाची तयारी आयोजकांनी केली आहे.
तपास कुठवर आला हे कधी सांगणार?
पोलीस प्रशासनाचा तपास कुठपर्यंत आला हे देशमुख कुटुंबीयांना व पूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आम्हाला समाधान तेव्हा भेटणार आहे जेव्हा माझ्या वडिलांना न्याय मिळेल. एक आरोपी अटक व्हायचा राहिला आहे आणि सीडीआर नुसार जे कोणी निघतील त्यांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करावी, अशी मागणी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केली आहे. पोलीस यंत्रणेवर कुणाचा दबाव आहे का यावर मी बोलत नाही पण, मला एक प्रश्न पडतो ते आम्हाला का सांगत नाहीत, या मागचं कारण काय ते आम्हाला सांगावं, अशी मागणी तिने केली.
लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती
आरोपीला पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, ही लाडकी बहिणीची कळकळीची विनंती आहे, असे संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती आहे की, तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा या चिमुकल्याकडे बघा. आम्ही फक्त न्याय मागत आहेत हे, माहित नाही उद्या त्याचा काय परिणाम होणार आहे. त्यांच्या पप्पाची हत्या झाली म्हणून हे बाहेर पडत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वाशिममध्ये मूक मोर्चा
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तसेच परभणी मधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूच्या निषेधार्थ वाशिममध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने वाशिममध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला जाणार आहे. मूक मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित राहणार आहेत. वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख देखील मोर्चात सहभागी होणार आहेत. वाशिम शहरात मूक मोर्चाचे ठीक ठिकाणी बॅनर्स लागले आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.