फक्त मंत्रिपद नाही, तर आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार, धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज
बीडच्या केज तालुक्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी ८२ दिवसांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतर आता त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीने झाली, त्यांना अमानुष मारहाण झाली आणि संतोष देशमुखांच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं याबद्दलचा सविस्तर घटनाक्रम या फोटोंद्वारे समोर आला आहे. यानंतर बीडमधील वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, ही मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली. आता मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. आता यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?
“आज सकाळी त्यांचा राजीनामा घेऊन त्यांचा पीए सागर बंगल्यावर पोहोचला. तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे”, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
यांना मनं तरी आहे का?
“धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे, असे चॅलेंज अंजली दमानिया यांनी दिले. धनंजय मुंडे यांचा ट्वीट दाखवलं. ते ट्विट बघून तर आणि डोकं फिरलं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस किती? हा माणूस असू शकतो की या माणसाला, काय बोलावं काय बोलावे माणसाला, त्यांनी ट्विट केलंय. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझ्या पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो बघून तर मन अत्यंत व्यथित झाले, यांचे मन, यांना मनं तरी आहे का?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
अधिवेशनात तुम्ही काय फेरफटका मारायला आला होता का?
“पहिले म्हणजे यांचे मन अत्यंत व्यथित झाले आहे, पुढे ते लिहितात, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला पाहिजे आहे. म्हणून वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे मुख्यमंत्री महोदयांकडे दिला. मंत्रीपदाचा राजीनामा याची तब्येत बरी नाही म्हणून देत आहे त्यांच्यासोबत सत्सद विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतात की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला मग काल तिकडे अधिवेशनात तुम्ही काय फेरफटका मारायला आला होता”, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार
“काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होता. सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटीगाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला. अरे तुम्हाला लाज नाही येणार म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही त्याची हकालपट्टी झाली पाहिजे. त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे. मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणारे आणि माझी आदरांजली संतोष देशमुखांना मी राजीनामा सोडा त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर मी जाऊन पुन्हा एकदा येऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटेन. हीच माझी त्यांना आदरांजली असेल”, असेही अंजली दमानियांनी म्हटले.
“एवढंच नाही तर करुणा मुंडे, रेणुका शर्मा या प्रत्येक स्त्रीला त्यांनी जितकं जितकं छळलंय. मी आजपर्यंत या विरुद्ध बोलले नव्हते, पण आज मला बोलावसं वाटतंय की त्या प्रत्येक जेलमध्ये काढलेल्या मिनिटामिनिटांचा हिशोब आज त्यांना मिळालेला आहे. त्याची अद्दल हे धनंजय देशमुखला घडली आहे. कारण हे जे आपण म्हणतो ना की पापाचा घडा भरला, तसा त्यांच्या पापाचा घडा आता भरलेला दिसतोय आपल्याला”, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.