बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश, बंदुकीसोबत फोटो काढणाऱ्यांवर मोठी कारवाई

| Updated on: Dec 29, 2024 | 8:34 AM

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश, बंदुकीसोबत फोटो काढणाऱ्यांवर मोठी कारवाई
देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख
Follow us on

Santosh Deshmukh Murder case : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी काळे कपडे घालून, काळ्या फिती लावत हजारो लोक मोर्चात सहभागी झाले. “वाल्मिकी कराडला अटक करा. धनंजय मुंडे राजीनामा द्या”, अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. त्यातच आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

फरार आरोपींची संपत्ती जप्त करा

बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरु करा, तसेच बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

कडक कारवाईला सुरुवात

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडून करण्यात येत आहे. आता याप्रकरणी कडक कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांना दोन महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचे आदेश काय?

बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करा. ही प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच आतापर्यंत ज्या बंदुकीचे परवाने दिले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या, असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

…तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 19 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये बोलताना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. वाल्मिकी कराड यांना अटक करावी, जोपर्यंत या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.