संतोष देखमुखांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?
संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आणि इतर बाबींवर देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहेत. या चौकशीत विविध खुलासे होत आहेत. त्यातच आता दुसरीकडे संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. यावेळी ते मुख्यमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आणि इतर बाबींवर देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंब त्यांची बाजूही मांडणार आहेत. या भेटीसाठी भाजप आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेतला आहे.
तर दुसरीकडे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. सुरेश धस यांनी अजित पवारांना ग्राऊंड रिअॅलिटी सांगणार, असे म्हटले आहे. त्यामुळे ते लवकरच अजित पवारांची भेट घेतील, असे म्हटले जात आहे.
लातूरमध्ये आज रास्ता रोको आंदोलन
तसेच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणि परभणी घटनेच्या निषधार्थ लातूर शहरातील अनेक चौकांमध्ये आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आरोपींना कठोर शिक्षा करा अशी आंदोलकांची मागणी आहे. लातूरचा अडत बाजार बंद करण्यात आला आहे. तसेच लातूर ते अंबाजोगाई रस्त्यावर महापूर जवळ रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतूक ठप्प आहे. आजच्या चक्का जाम आंदोलनात सर्व स्तरातील लोकांचा सहभाग असणार आहे.
सर्वक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन विरोधकांकडून सातत्याने सरकारला धारेवर धरलं जात आहे. काल याप्रकरणावरुन सर्वक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना पत्र दिले. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात भाजपचे सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर तसेच जितेंद्र आव्हाड, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा त्यात समावेश होता.