हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवतंय, संजय राऊतांचा मोठा आरोप, बीडच्या मोर्चामागचे कारणही सांगितले
जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतील, असेही संजय राऊतांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त केला जात आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे. आता याबद्दल विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बीडच्या मोर्चाबद्दल एक विधान केले आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीडमध्ये आज होणाऱ्या मोर्चाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेट वक्तव्य केले. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
“हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे”
“बीडमधील मोर्चा झाला. राष्ट्रीय स्वरूप नाही. सर्वच पक्षाचे लोक बीडमधील जनता बीडमधला दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे”, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे-संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेणार”
“खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत, अशी लोकांची भावना आहे. या मोर्चामध्ये अनेक मोठ्या नेते सहभागी होतील. शिवसेनेतर्फे आमचे संभाजीनगरचे सगळे प्रमुख नेते आहेत. ते यात सहभागी होतील. जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतील”, असेही संजय राऊतांनी सांगितले.
“आपल्या मराठी अस्मितेचे नुकसान”
“भाजप ॲक्शन मोडमध्ये म्हणजे काय ईव्हीएम ताब्यात घेणं पैसे जमा करणे, पैसे कुठे वाटत आहे ते पाहणं ही त्यांची एक्शन मोड असते. आम्ही कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मुंबई महानगरपालिका निवडणूक असतील विधानसभेच्या निवडणुका असतील लोकसभेच्या निवडणुका असतील आमची ताकद आमचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांना विकत घेणारी नवी जमात जर राजकारणात, महाराष्ट्रात वाढत असेल, तर नुकसान महाराष्ट्राच आहे आणि संपूर्ण आपल्या मराठी अस्मितेचे आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.