“माझा भाऊ गेला, त्याला शेवटचं पाणीही दिलं नाही…”, संतोष देशमुखांच्या बहिणीच्या अश्रूंना नाही खळ, टाहो फोडत म्हणाली…
संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चा काढला जात आहे. आज धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात त्यांची बहीण प्रियांका चौधरी सहभागी झाल्या होत्या.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच आता नुकतंच याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. यामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चा काढला जात आहे. आज धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात त्यांची बहीण प्रियांका चौधरी सहभागी झाल्या होत्या.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या मोर्चापूर्वी संतोष देशमुख यांची बहीण प्रियांका चौधरी यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी हळहळ व्यक्त केली. “मुख्यमंत्रीसाहेब कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर आरोपींना पकडा आणि त्यांना फाशी द्या”, अशी मागणी प्रियांका चौधरी यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कळकळीची विनंती…
“मला मुलांसाठी मोर्चात सहभागी व्हावे लागतं आहे. भाऊ तर गेला त्याला शेवटचे पाणी सुद्धा दिलं नाही. त्याने मला मरता मरता वाचवलं आहे. फक्त या चिमुकल्यासाठी मी बाहेर पडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कळकळीची विनंती आहे. लवकरात लवकर आरोपींना पकडा आणि त्यांना फाशी द्या”, असे प्रियांका चौधरी म्हणाल्या.
“माझा देव घरात होता, पण मी ओळखू शकले नाही”
“आज मुलांचे शिक्षणाचे वय आहे. त्यांच्यावर जर वेगळा परिणाम झाला तर जबाबदार कोण? मी माझ्या भावासाठी काहीच करू शकले नाही. तोच माझा आधार होता, तोच माझा देव होता, तोच माझा आनंद होता. आमचा आनंद गेला. आता जगण्याची पण इच्छा नाही, फक्त चिमुकल्यांसाठी तळमळ वाटते. सत्य वागणं, जगणं पाप आहे का? म्हणजे काय सत्य वागायचं नाही का? सत्यासाठी जगायचं नाही का? तो स्वतःसाठी कधी जगला नाही. माझा देवावर विश्वास आहे, माझा देव घरात होता, पण मी ओळखू शकले नाही. देवाजवळ देर है, अंधेरे नही है”, असेही प्रियांका चौधरींनी सांगितले.