“मुख्यमंत्री भावाला कळकळीची विनंती, लाडक्या बहिणीला…”, संतोष देशमुख यांच्या पत्नीचं आवाहन; अख्खं कुटुंब सिंदखेड राजा येथील मोर्चात
आज बीडमधील घटनेच्या निषेधार्थ सिंदखेड राजा येथे आज मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी बीडमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होता. त्यानंतर आज बीडमधील घटनेच्या निषेधार्थ सिंदखेड राजा येथे आज मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे.
संतोष देशमुख यांचे कुटुंब सिंदखेड राजा या ठिकाणी असलेल्या सकल मराठा समाजातील मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करा, आरोपींना अटक करा, त्यांना शिक्षा करा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कळकळीची विनंती केली.
याप्रकरणी “आरोपीला लवकर अटक झाली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे. पण तुम्ही जे नाव घेताय त्याबाबत मला काही माहिती नाही”, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले. यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नीने एक मोठी मागणी केली आहे. “वाल्मिक कराडबाबत माहीत नाही. मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक करावी. त्याला शिक्षा करावी. लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री न्याय मिळवून देतील विश्वास आहे”, असे संतोष देशमुख यांची पत्नी म्हणाल्या. तर संतोष देशमुख यांच्या मुलाने “आम्ही मोर्चाला आलोय. आम्हाला न्याय मिळून दिला जाईल”, असे म्हटले आहे.
अंजली दमानियाही आक्रमक
तर दुसरीकडे सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जोपर्यंत वाल्मिक कराड यांना अटक होत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा, या प्रकरणात वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली जावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंजली दमानिया यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. या दरम्यान अतिशय गंभीर माहिती मिळत आहे. याच विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा, दमानियांची मागणी
वाल्मीक कराड यांचे अनेक बार आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जात आहे. जिल्ह्यात शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचे फोटोज जिल्हाधिकाऱ्यांना दाखवण्यात आले. या अनुषंगाने पुढील तीस दिवसात कारवाई करू, असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचं दमानिया यांनी सांगितले.
जोपर्यंत वाल्मीक कराड याला अटक होत नाही. तोपर्यंत हा लढा असा सुरू राहणार. तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, असेही अंजली दमानिया म्हणाल्या. त्यामुळे आज दिवसभरात काय खुलासे होतात हे महत्त्वाचं आहे..