संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस अधिक्षकांची बदली, शरद पवार आज कुटुंबियांची भेट घेणार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे आज मस्साजोग दौरा करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले आहे.
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे आज मस्साजोग दौरा करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 13 दिवस पूर्ण होत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आज मस्साजोग दौरा करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. “आमच्या राजाला न्याय पाहिजे” अशा आशयाचे बॅनर सध्या मस्साजोगमध्ये झळकताना दिसत आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना सक्तीच्या वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याची घोषणा केली होती. यानंतर अविनाश बारगळ यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार असणार आहे.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करु, देवेंद्र फडणवीसांचे निवदेन
दरम्यान बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणानंतर सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरु आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षांच्या आमदारांनी या मुद्द्यावरून महायुती सरकारला परखड शब्दांत जाब विचारला. विरोधकांनी सातत्याने यावर राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात निवेदन सादर करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन सभागृहाला दिलं. तसेच, त्या भागातील पोलीस अधीक्षकांचीही बदली केल्याची माहिती देण्यात आली आहे.