बीड: राष्ट्रवादी भवनचे वीज बिल थकले, महावितरणने कनेक्शन कापले; एक महिन्यापासून राष्ट्रवादी भवनात अंधार..!
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सोनावणे यांनी वर्षभरात एकदाही या भवन मध्ये कार्यकर्त्यांची बैठक किंवा स्वतः बसलेच नाहीत. काल नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रवादी भवन हे सोयी सुविधायुक्त करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे.
बीडः कार्यकर्ते, नेते आणि लोकप्रतिनिधींना संपर्क साधता यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (Beed NCP) पक्षाकडून जिल्हा तिथं राष्ट्रवादी भवनची स्थापना करण्यात आलीय. बीडमधील राष्ट्रवादी भवनचे लाखो रुपयांचे वीज बिल (Electricity Bill) थकल्याने महावितरणकडून (MSEDCL)वीज कनेक्शनच कापण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून राष्ट्रवादी भवन मध्ये अंधार आहे. सध्या उन्हाचा पारा वाढतोय आणि अशातच राष्ट्रवादी भवन मध्ये वीज नसल्याने एकही नेता किंवा लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी भवन कडे फिरकत नाहीत. लाखो रुपये खर्चून उभी केलेली ईमारतीत वीजच नसल्याने बीडचे राष्ट्रवादी भवन सध्या शोभेची वस्तू बनली आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री, आमदारांना विश्राम गृहाचा सहारा..
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेळावे, शिबीर आणि विविध बैठका घेण्यात यावे. शिवाय एकाच ठिकाणी जिल्हाभरातील कार्यकर्ते नेत्यांचा संपर्क दांडगा व्हावा याच संकल्पनेतून टोलेजंग राष्ट्रवादी भवन बांधण्यात आले आहे. मात्र सध्या वीजच नसल्याने कार्यकर्ते नेत्यांनी राष्ट्रवादी भवन कडे पाठ फिरवली आहे. एरवी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी भवन मध्ये जनता दरबार भरवायचे. मात्र सुविधा नसल्याने या नेत्यांनी देखील शासकीय विश्राम गृहाचा आधार घेतला आहे.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उदासीन…
बीडमधील नगरपंचायत निवडणुकीतील पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं संघटनात्मक फेरबदल सुरु केले आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांना अखेर डीच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादी भवनच्या या ईमारतीकडे सोनवणे यांनी दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. सोनावणे यांनी वर्षभरात एकदाही या भवन मध्ये कार्यकर्त्यांची बैठक किंवा स्वतः बसलेच नाहीत. काल नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रवादी भवन हे सोयी सुविधायुक्त करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे.
इतर बातम्या-