मनोज जरांगे यांच्या समर्थकावर जीवघेणा हल्ला, गंभीर दुखापत, भररस्यात दबा धरून…
मनोज जरांगे यांचे समर्थक अमोल खुणे हे त्यांच्या गावी जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करत हल्ला केला. यामध्ये अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत रान उठवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकावर हल्ला झाला आहे. जरांगे यांचे समर्थक असलेले अमोल खुणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडाचा वर्षावर करत हल्ला केला. या हल्लामध्ये अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारांसाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. खुणे यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून तातडीने फरार झाले. खुणे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच हजारो समाज बांधवांनी त्यांच्यासाठी गेवराई रुग्णालयात धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल खुणे हे धानोरा गावचे रहिवासी आहेत. ते सुरूवातीपासून मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. कोपर्डी अत्याचारातील आरोपीवर हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुणे हे दोन वर्ष जेलमध्ये होते. जेलमधून बाहेर आल्यावर अमोल खुणे हे जरांगे पाटील यांच्यासोबत काम करत आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास ते गेवराईहून आपल्या धानोरा गावी जात होते. मात्र तेवढ्यात रस्त्यातच दबा धरून बसलेल्या तीन-चार जणांनी अमोल खुणे यांच्यावर अचानक दगडफेक केली. त्या दगडफेकीमध्ये अमोल खुणे गंबीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.
ते जखमी अवस्थेतच रस्त्यावर उभे असताना तेथील काही स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीसाठी पुढे धावले आणि त्यांनी खुणे यांना उपचारांसाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केलं. अमोल खुणे यांचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा मराठा बांधवांनी केला आहे. या दगडफेकीनंतर हल्लेखोर फरार झाले असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.