“धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य”, राष्ट्रवादीच्या आमदाराचे थेट विधान, पंकजा मुंडे म्हणाल्या “मी फक्त…”
मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना मी कुठे दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा. मी राजीनामा देईन. फक्त विषय काढला जात आहे. मी दोषी आहे की नाही हे सीएम आणि उपमुख्यमंत्री सांगतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.

Pankaja Munde On Dhananjay Munde : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तर इतर सात जणांवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड असून तो सध्या कोठडीत आहे. या घटनेनंतर सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे असे खळबळजनक ट्वीट केले आहे. यावर आता पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक मोठे विधान केले आहे.
संदीप क्षीरसागर काय म्हणाले?
संदीप क्षीरसागर यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट केले आहे. यात त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य असल्याचे म्हटले आहे. “वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसा धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार चा खास आहे त्यामुळे राजीनामा अशक्य..! भले किती ही पुरावे द्या तुम्ही अंजली दमानिया ताई” असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. याबद्दल पंकजा मुंडे यांना सवाल करण्यात आला. त्यावर पंकजा मुंडेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
#वाल्मिक_कराड जसा धनंजय मुंढे चा खास आहे, तसा धनंजय मुंढे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार चा खास आहे त्यामुळे राजीनामा अशक्य..! भले किती ही पुरावे द्या तुम्ही @anjali_damania ताई..!@timesnowbatmya@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
— Sandeep Bhaiya (@SRK_Speaks1) January 28, 2025
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
पंकजा मुंडे यांच्याशी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संदीप क्षीरसागर यांच्या ट्वीटबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. “मी काहीच पाहत नाही. मी तुमंच फक्त ऐकून घेतलं. बाकी मी काय बोलू”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनंजय मुंडेंचे राजीनाम्याबद्दल थेट वक्तव्य
दरम्यान धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबद्दल पहिल्यांदाच थेट विधान केले. या सर्व गोष्टीत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना मी कुठे दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा. मी राजीनामा देईन. फक्त विषय काढला जात आहे. मी दोषी आहे की नाही हे सीएम आणि उपमुख्यमंत्री सांगतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. गेले ५१ दिवस ज्या पद्धतीने ट्रायल सुरू आहे. टार्गेट मी आहे. मी निष्ठावंत आहे. निवडणुकीत जिथे जाईल तिथे माझ्या पक्षाचा प्रचार करेल. आपण निवडणुकीत टीका करतो आणि टीका सहनही करतो. पुन्हा राग नसतो. माझ्या विरोधात प्रचाराला होते म्हणून आपण असं करावं हे योग्य नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.