बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. (Beed Parli On Dhananjay Munde Rape Allegation)
या सर्व घडामोडीनंतर धनंजय मुंडेंचा मतदारसंघ असलेल्या बीडमधील परळीकरांची प्रतिक्रिया काय? याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र परळीकर हे धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र सोशल मीडियातून दिसत आहे.
परळीकरांची प्रतिक्रिया काय?
धनंजय मुंडेंच्या आरोपामुळे परळी आणि बीडच्या जनतेत मोठा असंतोष पसरला आहे. गेल्या 22 वर्षापासून माझा छळ होत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मग इतकी वर्ष ही महिला चिडीचूप का होती? असा संतप्त सवाल बीडकरांनी केला आहे.
तर मुंडे समर्थकांनी धनंजय मुंडे यांचे राजकीय स्थान पाहून विरोधकांचा हा डाव असावा, अशी शंका व्यक्त केली आहे. धनंजय मुंडेंना अनेक वेळा संघर्ष करावा लागला. संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी डगमगू नये. सर्व बीड जिल्हा त्यांच्या पाठीशी आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
राज्याच्या विधानपरिषदेवर विरोधी पक्षनेते म्हणून तब्बल पाच वर्ष धनंजय मुंडे यांनी कमान सांभाळली आहे. या कार्यकाळात त्यांनी अनेक महिला आणि मुलीवरील अत्याचारांना वाचा फोडत त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्या धनंजय मुंडे यांच्याकडून अशी चूक कधीही होणार नाही, असा ठाम विश्वास परळीकरांना वाटतो आहे. त्यामुळे आरोप झालेल्या या गोष्टीत किती तथ्य आहे हे मात्र तपासानंतरच निष्पन्न होईल, अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.
काय आहे प्रकरण?
रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.
त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.”
धनंजय मुंडेंचा राजकीय संघर्ष
दिवंगत लोकनेते काका गोपीनाथ मुंडे यांच्या हाताच्या बोटाला धरून राजकारणात आलेले पुतणे धनंजय मुंडे यांचा संघर्ष तसा खडतर आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून खऱ्या अर्थाला राजकारणाला सुरूवात झाली. पुढे त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षापर्यंत मजल मारली. मात्र कौटुंबिक वादातून या घराणेशाहीकडेही राजकीय नजर लागली. गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे बंधू पंडितअण्णा मुंडे यांच्यात राजकीय वाद शिगेला पोहचला. आपला मुलगा धनंजय यांना आमदार करावं अशी इच्छा पंडितअण्णा मुंडे यांची होती.
घरातच कलह निर्माण झाल्यामुळे पंडितअण्णा यांनी गोपीनाथ मुंडे यांना सोडचिठ्ठी देत हे राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने मुंडे विरुद्ध मुंडे असंच समीकरण राजकारणात तयार झाले. 2014 साली धनंजय मुंडे यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करून एक नव्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. 2019 च्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून ते राज्याच्या मंत्रिमंडळात स्थानबद्ध झाले. (Beed Parli On Dhananjay Munde Rape Allegation)
संबंधित बातम्या :