बीडमधील सरपंच हत्याप्रकरणी पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांना भेटणार, आरोपींची नार्को टेस्ट करण्याची कुटुंबाची प्रमुख मागणी
आज सकाळी 9 वाजेपासून केजमध्ये लातूर-बीड मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केलं होतं. तसेच यावेळी आंदोलकांनी एसटी बसची जाळपोळ केली. यामुळे बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे.
Beed Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला होता. यामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज सकाळी 9 वाजेपासून केजमध्ये लातूर-बीड मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केलं होतं. तसेच यावेळी आंदोलकांनी एसटी बसची जाळपोळ केली. यामुळे बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे. आता याप्रकरणी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वडिलांसोबत जे काही घडले, ते इतर कोणासोबत घडू नये, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले.
आरोपींची नार्को टेस्ट करावी – वैभवी देशमुख
“माझे वडील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांची अशा पद्धतीने क्रूर हत्या व्हायला नको होती. त्यांनी कोणाचेही वाईट चिंतले नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी केवळ दोन आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींना देखील तात्काळ अटक करावी. तसेच आरोपींची नार्को टेस्ट करावी ही माझी प्रमुख मागणी आहे. माझ्या वडिलांसोबत जे घडले ते इतर कोणासोबतही घडू नये. त्यासाठी पोलिसांनी कारवाईची योग्य पाऊले उचलावीत”, असे वैभवी देशमुखने म्हटले.
“माझ्या भावाला न्याय मिळावा हीच अपेक्षा”
तसेच याप्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. माझ्या भावाला समाजसेवेचे वेड होते. समाजसेवा करतानाच त्याचा जीव गेला. गावात कधीही भांडणे झाली नाहीत. आदर्श गाव म्हणून मस्साजोग गावाची ओळख निर्माण केली होती. हे पहिलेच भांडण झाले आणि अंत झाला. भावाच्या मारेकऱ्यांना तीन दिवसाच्या आत पकडण्याचे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. त्यांनी ते पाळावे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
आरोपींचे मोबाईल रेकॉर्ड तपासण्यात यावे. त्याशिवाय अटक झालेल्या आरोपींची नार्को टेस्ट करावी, अशी आमची मागणी आहे. गेल्या 20 वर्ष ग्रामस्थांनी आम्हाला ओटीत घेतले. पंधरा वर्ष सलग आम्हाला प्रतिनिधित्व दिलं. सध्या आम्ही दुःखात आहोत. तीन दिवसानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. माझ्या भावाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.
“विशेष यंत्रणेद्वारे तपास व्हावा”
तसेच याप्रकरणी आमदार पंकजा मुंडे यांनीही मस्साजोगचे खून प्रकरण आणि परळीच्या अपहरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत व्हावा, अशी मागणी केली आहे. मस्साजोग येथील सरपंचाचा खून आणि परळीतील व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा, अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच बीड जिल्हयात घडणाऱ्या अशा घटनांविषयी पंकजा मुंडेंनी चिंता व्यक्त केली आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.
दरम्यान मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्यावर तब्बल 24 तासानंतर काल मध्यरात्री अंतिम संस्कार करण्यात आले. येत्या 48 तासात सर्वच आरोपींना जेरबंद करू असा आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी कालचा रस्ता रोको आंदोलन स्थगित केलं होतं. मात्र आज दुसऱ्या दिवशीही मसाजोगच्या ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मस्साजोगमधील सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.