धनंजय मुंडेंना सहआरोपी करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले “कायद्यात…”
सीआयडीने बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात हत्येचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे समाविष्ट आहेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद सोडले आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या करताना, त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो समोर आले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. या हत्येच्या कटात सहभागी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानतंर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिवेशनात झालेल्या विविध घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरही भाष्य केले.
“दोन्ही सभागृहांनी मिळून १२ कायदे मंजूर केले आहेत. माथाडी कायद्यात सकारात्मक सुधारणा केली आहे. माथाडींवर अन्याय होणार नाही, मात्र फेक माथाडी आणि ब्लॅकमेलिंग बंद होईल. खासगी सुरक्षा रक्षक बिल, विनियोजन विधेयक देखील पास केलं आहे. अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो त्यांनी ५ सूत्रांवर आधारित अर्थसंकल्प मांडला. महिला दिनी विशेष चर्चा झाली आणि वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून राज्यसमोरील प्रश्नांवर सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कुठेही पळ काढला नाही आणि सकारात्मक चर्चा केल्या. मंत्र्यांनी देखील चांगले काम केलं. अनेकदा सभागृह ९.४५ ला सुरु व्हायचे. मंत्र्यांनी योग्य अशी उत्तरं दिली. विरोधी पक्षाला आम्ही वाव दिला त्यांना उत्तरं दिली”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यांच्या डोक्यात फक्त कबर आणि कामरा दिसतो
“विकासासाठी अनेक धोरणं असलेला अर्थसंकल्प पारीत केल्याने विकासाला गती मिळेल. अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व आमदार, पीठासीन अधिकारी कर्मचाऱ्यांचे आणि माध्यमांचे आभार मानतो. आपली प्रथा परंपरा आहे भाषण चांगलं झालं की चिठ्ठी पाठवायची. तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. अध्यक्षांवर आमचा काही दबाव नाही. तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा. रोज ६ तास काम करायला पाहिजे मात्र आम्ही ९ तास काम केलं. त्यांच्या डोक्यात फक्त कबर आणि कामरा दिसतो त्याला आम्ही काय करणार”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
जे कायद्यात होतं ते केलेलं आहे
“लक्ष्यवेधी मांडल्या तर हरकत नाही. निकषात बसणाऱ्या लक्ष्यवेधीच आल्या पाहिजे बाकी नाही. विनापुरावे बोलणं बरोबर नाही. उलटसुलट काम व्हावे असं वाटत नसेल तर निकषानुसारच व्हाव्यात. कायदे विनाचर्चेनं पास झाले नाही, चर्चा झाल्या. अर्थसंकल्प अधिवेशनात खातेनिहाय चर्चा होत असते. धनंजय मुंडे प्रकरणी मी फार स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की याबद्दल नाराज असण्याचे काहीही कारण नाही. आम्ही कायद्याने चालतो. जे कायद्यात असतं ते करतो. जे कायद्यात होतं ते केलेलं आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.