“संतोष देशमुख यांच्या हत्येला पाठिंबा नाही”, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले
मी कधीही हत्येला पाठिंबा दिलेला नाही. मी वारकरी आहे. आम्ही प्राणी मारत नाही. आम्ही शाकाहारी माणसं आहोत. माणूस मारल्यानंतर आम्ही त्याला पाठिंबा देऊ असे तुम्हाला का वाटतं? असा सवाल नामदेव शास्त्रींनी उपस्थित केला.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या मराठवाड्यातील राजकारण तापलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन केले जात आहेत. त्यातच आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीनचिट दिली आहे. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे” असे विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले. यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मी संतोष देशमुख यांच्या हत्येला मी कधीही पाठिंबा दिलेला नाही, असे म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
“मी कधीही हत्येला पाठिंबा दिलेला नाही”
नुकतंच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी ‘टीव्ही 9 मराठी’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या विधानाबद्दल सविस्तर भाष्य केले. “धनंजय मुंडेंची अवस्था आणि त्यांची मानसिकता याला मी आधार दिला. मी त्यांना हे सांगितलं की माझा त्यांना पाठिंबा आहे. संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, यात जे कोणी आरोपी आहेत, त्यांना फाशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. यंत्रणा काम करते. न्यायालयीन व्यवस्था काम करतेय. यात नामदेव शास्त्री कुठे आहेत. मी कधीही हत्येला पाठिंबा दिलेला नाही. मी वारकरी आहे. आम्ही प्राणी मारत नाही. आम्ही शाकाहारी माणसं आहोत. माणूस मारल्यानंतर आम्ही त्याला पाठिंबा देऊ असे तुम्हाला का वाटतं?” असा सवाल नामदेव शास्त्रींनी उपस्थित केला.
“धनंजय मुंडेंची आई आणि बाबा हे भगवान बाबांचे शिष्य आहेत. परंपरेने ते भगवान बाबांचे भक्त आहेत आणि एखादा भक्त जर भगवान गडावर आला आणि त्याने जर आशीर्वाद दिला तर त्याचे राजकारण करण्याइतपत कोती बुद्धी महाराष्ट्राची नसावी असे मला वाटते”, असेही नामदेव शास्त्री म्हणाले.
हत्येचा आणि पाठिंब्याचा विषय वेगवेगळा
“धनंजय मुंडे हे जेव्हा भगवान गडावर आले तेव्हा त्यांच्या हाताला सलाईनची सुई होती. त्यांना गडावर आल्यावर सलाईन लावलेली होती. ज्या माणसाचा चेहरा ५३ दिवसांपासून खराब झालेला आहे, त्याच्या हाताला सुई आहे, रक्त येतं, तरीदेखील एखाद्या संताने आशीर्वाद द्यायचा नाही ही कुठली वृत्ती आहे. हत्येचा आणि पाठिंब्याचा विषय वेगवेगळा आहे. ते भगवान गड मोठा करतात. हत्येला किंवा आरोपीला पाठिंबा दिला असता तर तुमचं म्हणणं बरोबर होतं”, असेही नामदेव शास्त्रींनी सांगितले.
संतोष देशमुखांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भगवानगड उचलायला तयार
संतोष देशमुखांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भगवानगड उचलायला तयार आहे. माणूस परत येत नाही हे सत्य आहे. त्यांना जेवढा खर्च लागेल, जितका निधी लागेल, त्यांच्या लग्नापर्यंत, त्यांच्या शिक्षणापर्यंत सर्व खर्च भगवान गड उचलायला तयार आहे. अगोदर १५० विद्यार्थी आहेत अजून दोन विद्यार्थी वाढले तर काही फरक पडत नाही. भगवान गडाचे ते कर्तव्य आहे, असे नामदेव शास्त्रींनी म्हटले.
“गेले ५३ दिवस जातीवाद सुरु नाही तर काय सुरु आहे? कोण काय बोलतं काय नाही ही ग्राऊंड लेव्हलची परिस्थिती फार वाईट आहे. ज्या साधूसंतांनी आतापर्यंत कार्य केलं आहे हे राजकीय वादळामुळे उद्धवस्त झालं आहे. राजकारण्यांनी समाज सलोखा बिघडवला आहे. आजही साधूसंत तो एकत्र करतात. सांप्रदायावर आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. साधू संतांनी नेहमीच जातीय सलोखा राखलाय”, असेही त्यांनी सांगितले.
“तुम्ही साधूवर आक्षेप घेता ही कोणती बुद्धी असावी”
“सध्या सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागलेले आहेत. मग त्या माणसाने किती आघात सहन करावे. गेल्यावेळीही आघात झाले. आताही आघात होतात. मानसिक आधार देणं हा वारकरी संप्रदायात गुन्हा मानला जात नाही. मी जर हत्येच समर्थन केले, आरोपीचं समर्थन केलं असतं तर तुमचं बोलणं योग्य होतं. आरोपीला फासावर चढवा, पण जो निर्दोष आहे त्याच्यासोबत बोललं तरी तुम्ही साधूवर आक्षेप घेता, म्हणजे ही कोणती बुद्धी असावी”, असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.