संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी उभे केलेल्या महिलेच्या हत्येमागील कारण समोर, पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका महिलेची कळंब येथे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मनीषा कारभारी बिडवे नावाच्या या महिलेचा मृतदेह तिच्या घरी सडलेल्या अवस्थेत आढळला.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत एका महिलेचा तिच्या राहत्या घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मनीषा कारभारी बिडवे असे या मृत महिलेचे नाव आहे. ही महिला बीडच्या आडस गावात राहणारी आहे. या महिलेचा वापर संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी करण्यात येणार होता असा आरोप अंजली दमानियांकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा यांचा मृतदेह घरात ५ ते ६ दिवसांपासून पडून होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. आज याचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. या शवविच्छेदन अहवालात या महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोपीला शोधण्यासाठी गोव्याला रवाना
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी गोव्यात असल्याची माहिती मिळाली आहे. धाराशिव पोलिसांचे एक पथक आरोपीला शोधण्यासाठी गोव्याला रवाना झाले आहे. मृत मनीषा बिडवे यांनी यापूर्वी कळंब पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचे दोन गुन्हे दाखल केले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी ज्योती मंगल जाधव आणि खून झालेल्या मनीषा बिडवे यांचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. या घटनेप्रकरणी कळंब पोलीस स्टेशनमध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
अनैतिक संबंधातून महिलेची हत्या
कळंबमधील द्वारका नगरी वसाहतीत मृतदेह आढळलेल्या त्या महिलेबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा हे महिलेचे जन्मगाव आहे. तर बीड जिल्ह्यातील आडस हे महिलेचे माहेर आहे. ती कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीत एकटी राहत होती. मृत महिला खासगी सावकारी देखील करत असल्याची माहिती समोर येत आहे. अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
या महिलेच्या हत्येनंतर शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यात महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचा खुलासा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. तिचा मृतदेह घरात होता आणि बाहेरून कुलूप लावलेले होतं, असेही पोलिसांनी म्हटले आहे.