परळीत भाजप शुन्यावर! पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमधील राजकीय वैर वाढणार?
बबन गित्ते यांच्या घरासमोर दीडशे ते दोनशे कार्यकर्त्ये जमा झाले होते. तेव्हा पोलिसांनी ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.
बीड: परळी पंचायत समितीत सामाजिक न्याय आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का देत भाजपची संख्या शुन्यावर आणली आहे. कारण पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधातील अविश्वास ठरावादरम्यान भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सभापतींविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं. आता भाजपचे हे तीनही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने भाजपच्या पंचायत समिती सदस्यांची संख्या शून्य झाली आहे. दरम्यान, यावेळी उर्मिला गित्ते यांच्या घरातून 2 बंदुकांसह धारदार शस्त्र हस्तगत करत पोलिसांनी बबन गित्ते यांना अटक केली आहे. (2 guns and sharp weapons was seized from the house of Baban Gitte)
2 गावठी पिस्तुल, 4 जिवंत काडतूस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परळी पंचायत समिती सभापतीविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. तरीही बबन गित्ते यांच्या घरासमोर दीडशे ते दोनशे कार्यकर्त्ये जमा झाले होते. तेव्हा पोलिसांनी ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी गित्ते यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 2 गावठी पिस्तुल, 4 जिवंत काडतूस आणि लाठ्या-काठ्यासह अन्य धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची प्रक्रिया पार पडली. त्याचवेळी परळी शहरातील अंबाजोगाई रोडवरील बबन गित्ते यांच्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. तिथे जमललेल्या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस आणि गित्ते समर्थकांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यावेळी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचं कारण देत पोलिसांनी गित्ते आणि त्यांच्या 11 कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर परळी शहरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
पंचायत समितीत भाजप शून्यावर!
परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी दुपारी बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. 12 सदस्यांची संख्या असलेल्या परळी पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता. आज यावर मतदान झाले. मतदानावेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला.
12 सदस्य असलेल्या परळी पंचायत समितीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटाचे 8 सदस्यांसह वर्चस्व आहे. त्यातच भाजपचे आणखी 3 सदस्य नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले असल्याने आता पंचायत समितीच्या कार्यकारिणीत भाजपचे संख्याबळ शून्य झाले आहे. भाजपचा एक सदस्य आधीच अपात्र झाला आहे. त्यामुळे परळीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.
पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर वाढणार?
गेल्या काही दिवसांत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर शमल्याची चर्चा सुरु होती. दोघांकडूनही तसे संकेत देण्यात येत होते. पंकजा मुंडे मधल्या काळात आजारी असताना धनंजय मुंडे यांनी आपण पाठीशी असल्याचं सांगत धीर दिला होता. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील भाऊ विरुद्ध बहिणीचा संघर्ष संपेल अशी आशा निर्माण झाली होती. पण आता परळी पंचायत समितीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजांना मोठा धक्का दिल्यामुळे बंधू-भगिनीतील राजकीय वैर वाढणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
संबंधित बातम्या:
आधी उर्मिला गित्तेंनी सभापतीपद गमावलं, नंतर पतीला अटक, परळीत तणाव
परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पंचायत समिती सभापतीवर अविश्वास
2 guns and sharp weapons was seized from the house of Baban Gitte