Beed | 75 वर्षीय महिलेचा अंत्यविधी रोखून धरला, स्मशानभूमीच्या जागेचा वाद, केजमधील सोनेसांगवी शिर्डी गावातील प्रकार
या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता असून महिलेच्या पार्थिवावर लवकरच अंतिम संस्कार करण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे.

बीडः अंत्यविधीसाठी जमीन नसल्यामुळे बीडमधील (Beed village) एका गावातील दलित वृद्धेच्या पार्थिवावर अंतिम संस्कारच रोखण्यात आले आहेत. मागील 20 तासांपासून हा मृतदेह (Woman Death) तसाच ठेवण्यात आला आहे. स्मशान भूमीच्या (Cemetery) वादावरून गावात अंत्यविधी रोखून धरल्याची ही सलग तिसरी घटना आहे. मंगळवारी या गावात एका वृद्धेचा मृत्यू झाला असून पूर्वीपासून चालत आलेल्या जागेवर आता अंत्यविधी करू देण्यात येणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
काय आहे वाद?
गावातील ज्या जमिनींवर पूर्वीपासून अंत्यविधी केले जात होते, त्या ठिकाणी आता हा विधी केला जाऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे गावातील दलित समाजातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असता तिच्यावर अंत्यविधी कुठे करायचे असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा वाद सुरु असून अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह ताटकळत ठेवण्याची ही सलग तिसरी घटना आहे. मागील वेळीदेखील गावात या कारणामुळे तणाव निर्माण झाला होता. कालपासून गावात तशीच स्थिती आहे.
तहसीलदार, पोलीस गावात दाखल
गावातील आंबूबाई साखरे या 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मात्र जागेच्या वादामुळे ग्रामस्थांनी मागील 20 तासांपासून अंत्यविधी रोखून धरला आहे. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. घटनेची माहिती कळताच तहसीलदार आणि पोलीस प्रशासन गावात दाखल झाले आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता असून महिलेच्या पार्थिवावर लवकरच अंतिम संस्कार करण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे.