मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, आजपासून अन्नत्याग आंदोलन, 7 प्रमुख मागण्या कोणत्या ?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यांच्या 7 मागण्यांमध्ये पोलिसांवरील कारवाई आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचा समावेश आहे. दोन दिवसांत सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला. पण याप्रकरणातील आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही तसेच या हत्याकांडातील आरोपी असलेल्या आकाचा आका अजूनही मोकाट फिरतोय. आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे हा तर कधीपासूनच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोकाट फिरतोय, त्याला अजूनही अटक झालेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मस्साजोगचे ग्रामस्थ हे अतिशय आक्रमक झाले असून या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी ग्रामस्थांची भूमिका असून आजपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तर पाण्याचा घोटही घेणार नाही
आज सकाळी 10 वाजल्यापासून बीडमधीस ग्रामस्थांच अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील 7 मागण्यांसाठी गावकरी आक्रमक झाले असून त्यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे. दोन दिवसात आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणी ही पिणार नाही असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान आज दुपारी मनोज जरांगे पाटील अन्नत्याग आंदोलनाला भेट देणार आहेत.
काय आहेत गावकऱ्यांच्या 7 प्रमुख मागण्या ?
1) केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करा.
2) फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा.
3) याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा.
4) संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.
5) वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करा.
6) आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून सहआरोपी करा.
7) घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी PSI राजेश पाटलांनी तो कोणाच्या सांगण्यावरून कळंबच्या दिशेने वळवला याची चौकशी करा.