बीड : राज्यात दिवसभरात सुरू झालेलं अपघाताचं (Beed Accident) सत्र अजूनही काही संपायचं नाव घेत नाही. सकाळपासून अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही जणांनी आपला जीवही गमावला आहे. मात्र दिवसाच्या शेवटीही बीडमधून एक मनाला चटका लावून जाणारीच बातमी आली आहे. कारण बीडमध्येही एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल चार जणांचा मृत्यू (Accident Death) झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. चार जणांच्या मृत्यूवरून या अपघाताची भीषणता आपल्या लक्षात येते. बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातला आहे. या कुटुंबासह परिसरावरही सध्या या अपघातामुळे शोककळा पसरली आहे.
हे कुटुंब रस्त्यावरून प्रवास करत असताना अचानक धामणगांव घाटात त्यांची चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला जावून आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यु झाला आहे. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काळ हा कधी सांगून येत नाही. त्यामुळे प्रवासात सावधानचा बाळगणे गरजेचे असते. खासकरून घाटातील रस्ते हे अत्यंत जोखीमेचे रस्ते असतात. त्यामुळे घाटमाथ्याच्या रस्त्यावत विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
अनेकदा चाकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्यानेही असे अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कित्येक घाट हे चालकांसाठी एक मोठं आव्हान असते. यावेळी परिस्थिती आणि वेगावर ज्याचं नियंत्रण असते त्यांना यावर मात करता येते. मात्र अनेकदा परिस्थिती नियंत्रणात राहत नाही. गाडीचा वेग चालकाच्या आवाक्याच्या बाहेर जातो आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि असे भयानक अपघात घडतात. या भागात अलिकडे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या भागातील अपघात रोखण्याचं आव्हानही प्रशासन आणि नागरिकांपुढे असणार आहे. जेणेकरून पुन्हा अशी घटना घडू नये. अशा अपघातामुळे कुटंबं उद्धवस्त होतं. अनेकजण आपले जवळचे नातवाईक गमावतात. लेकरं नात्याला पोरकी होतात. तर काही कुटुंबं आपला आधार कायमचा गमावून बसतात. त्यामुळे या घटनांना आळा घालणे गरजेचे आहे.