Beed | अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू, बीडचे शिवसेना तालुका उपप्रमुख गणेश मोरेंचा अपघात की घातपात?
बीड ग्रामीण ठाण्याचे पीएसआय डीबी आवारे, जमादार आनंद मस्के, जी.व्ही. कांदे, खय्युम खान यांच्यासह महामार्ग पोलिसांनी अपघात स्थळी भेट दिली. घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली.
बीड | बीडहून लिंबागणेशकडे गावी जाणाऱ्या शिवसेना नेत्याच्या (Shiv Sena) दुचाकीला अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बीडमधील शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे (Ganesh More) यांच्या डोक्याला या घटनेत गंभीर इजा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शुक्रावरी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बीड-मांजरसुंबा (Manjarsubha) महामार्गावरील मंझेरी फाटा येथे हा अपघात घडला. अपघातानंतर आजूबाजूचे लोक त्यांना मदत करण्यासाठी धावले. मात्र दुचाकीला एवढ्या जोरात धडक बसली की मोरे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. बीडचे ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान, ही घटना अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.
काय घडली नेमकी घटना?
शिवसेना तालुका उपप्रमुख गणेश मोरे शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता बीडहून लिंबागणेश येथे दुचाकीने जात होते. दरम्यान बीड-मांजरसुंबा महामार्गावर मंझेरी फाट्यावरील हॉटेल बळीराजासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघात की घातपात?
बीड ग्रामीण ठाण्याचे पीएसआय डीबी आवारे, जमादार आनंद मस्के, जी.व्ही. कांदे, खय्युम खान यांच्यासह महामार्ग पोलिसांनी अपघात स्थळी भेट दिली. घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली. तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
इतर बातम्या-