आमच्यातले काहीजण चुकले, पण मी अजितदादा कधीही कोणत्या बहिणीला..; अजित पवारांचं विधान चर्चेत
Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : अजित पवार आज बीडमध्ये आहेत. तिथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा अजितदादा लाडकी बहिण योजनेवर बोलते झाले. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. वाचा सविस्तर...
राष्ट्रवादी अजित पवार गटाची ‘जन सन्मान यात्रा’ सध्या सुरू आहे. आज ही यात्रा बीडमध्ये आहे. यावेळी अजित पवारांनी बीडकरांना संबोधित केलं. तेव्हा लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांनी भाष्य केलं. एवढी मोठी योजना लागू करणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही.जिद्द, चिकाटी आणि सरकारची इच्छाशक्ती यावर आम्ही योजना सुरू केली. नागपूरमधील कार्यक्रमात 1, 2 तारखेला पुढील टप्प्यातील राहिलेल्या महिलांना लाभ मिळणार आहे. मी अजितदादा कधीही कोणत्या बहिणीला फसवणार नाही. काहीजण आमच्यातले चुकले, त्यानी पैसे काढून घेतो म्हणायला नको होते. मी अजितदादा आहे. मी आपल्याला सांगतो. आपल्या भगिनीकडून कोणीही काढून घेणार नाही. काहीजण चुकीचं बोलतायत त्याकडे लक्ष देऊ नका. तर काही जणांना या योजनेचा बोजवारा उडवायचा आहे पण आम्ही तसे होऊ देणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
शिवरायांचा पुतळा कोसळला, अजित पवार म्हणाले…
अवघ्या देशाचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारही यावर बोललेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, पुरळा पाहिला की उर भरून येतो. मात्र काल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घटना घडली. कोणी म्हणतो नेव्हीने कामं केले, कोणी म्हणतो पीडब्ल्यूडीने कामं केले. पण चूक ती चूक आहेत त्यात कोणीही दोषी असो त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई सरकार करेन, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
आता लोक एकमेकांबद्दल टीका टिप्पणी करतात ही यशवंतराव चव्हाण यांची संस्कृती नाही. मी राजकारणाच्या सुरुवातीपासून कधीही टीका टिप्पणी करत नाही. त्यांनी काहीतरी वेडंवाकडं बोलायचं त्याला मी उत्तर द्यायचे यातून माय माउलींचे प्रश्न सुटणार आहेत का? त्यामुळे आगामी काळात तुम्ही आम्हाला साथ द्या, अशी साद अजित पवार यांनी बीडकरांना घातली.
आरक्षणावर काय म्हणाले?
लोकसभेला नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा चुकीचा प्रचार विरोधकांकडून केला गेला. पण आता सावध राहायचे आहे. आम्ही खोटे बोलणारे लोकं नाही. आम्ही स्पष्ट बोलतो. आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याचे कामं करतोय. त्यासाठी मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम यांच्यासाठी महामंडळ स्थापन केले. जाती, पाती, नाती, गोती यांचा विचार करायचा नाही तर सर्वांना समान न्याय द्यायचा. काही आरक्षणाचे प्रश्न आहे. मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे. मराठा समाज म्हणतोय आम्हाला 10 टक्के नकोय तर त्यातून पाहिजे. इतर समाजाचे पण आरक्षणाचे प्रश्न आहेत. आरक्षणाच्या बाबतीत कोणाचाच कोणाला विरोध करायचे कारण नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.