Satish Bhosale : खोक्या भाईला रॉयल पाहुणचार, नातेवाईकांशी गप्पाटप्पा, रसरशीत बिर्याणी आणि शाही बडदास्त
Beed Satish Bhosale Alias Khokya : सर्वसामान्यांना त्रास आणि गुन्हेगारांची शाही बडदास्त असा बीड पोलिसांचा रॉयल कारभार समोर आला आहे. यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सतीश भोसले ऊर्फ खोक्याला देण्यात येत असलेली व्हिआयपी ट्रीटमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

बॅटने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याप्रकरणात आणि इतर दोन प्रकरणात बीडचा खोक्या भाई राज्यभरात अचानक चर्चेत आला. त्याचे कारनामे समोर आले. प्रयागराज येथून त्याच्या मुसक्या आवळत त्याला बीडला आणण्यात आले. त्याच्या घरावर बुलडोजर चालले. पण आता बीड पोलीस त्याची शाही बडदास्त ठेवत असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सतीश भोसले ऊर्फ खोक्याला देण्यात येत असलेली व्हिआयपी ट्रीटमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
बीड कारागृहाबाहेरचा व्हिडिओ समोर
पोलिसांकडून खोक्याची शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याचा व्हिडिओसमोर आला. हा व्हिडीओ बीड कारागृहा बाहेरचा आहे. कारागृहाबाहेर खोक्या बिनधास्त मोबाईलवर बोलतानाचे त्यात समोर आले. जेलच्या आवारात कोणतीही परवानगी न घेता कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांशी त्याची मुक्त भेट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ताटकाळत ठेवणारे पोलीस भाईंसाठी इतके मेहरबान कसे होतात? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.




बिर्याणीचा डब्बा, रॉयल पाहुणचार
विशेष म्हणजे, त्याच्यासाठी खास बिर्याणीचा डब्बा आणण्यात आल्याचेही दिसले. व्हिडीओत खोक्यासोबत भाजप नेते सुरेश धस यांचे कार्यकर्ते आणि बीड जाळपोळ प्रकरणातील आरोपी अजिंक्य पवळ तसेच इतर गुन्हेगार मुक्त संचार करताना दिसत आहेत. यामुळे, न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपींसाठी पोलिसांची ही ‘शाही व्यवस्था’ नक्की कशासाठी आणि कोणाच्या आदेशावर सुरू आहे? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाल्मिक कराडनंतर खोक्या भाई
सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणातील आरोपी आक्का, वाल्मिक कराड याला यापूर्वी पोलीस व्हिआयपी ट्रीटमेंट देत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर टीकेची झोड उठली होती. पण बीड पोलीस आरोपींवर अधिक मेहरबान असल्याचे आणि त्यांचे त्यांच्याशी चांगले सूत जुळाल्याचे पुन्हा एकदा खोक्या प्रकरणात समोर आले आहे. त्यामुळेच बीड पोलिसांच्या बदल्यांची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. आता याप्रकरणी पोलिसांवर काय कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याप्रकरणात दोन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.