बीड : लग्नाळू मुलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लग्न करण्याच्या उद्देशानं (Fraud marriage) आमीष दाखवून लुटणाऱ्या टोळी नुकताच पर्दाफाश करण्यात आलाय. बीड पोलिसांनी केलेल्या कारवाई बनावट नवरीसह (Bogus Groove Arrested), तिची आई आणि मुख्य सूत्रधारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लग्नाच्या बहाण्यानं तरुणांना लुटणाऱ्यां पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवल्या गेलेल्या एका तरुणानं याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी (Beed Police) याप्रकरणी तपास करत आधी या टोळीच्या म्होरक्याला अटक केली. त्यानंतर आता याप्रकरणी पोलिसांनी बनावट नवरीसह तिच्या आईच्याही मुसक्या आवळल्यात. हा सगळा धक्कादायक प्रकार लग्न होऊन झाल्यानंतर आठ दिवसांनी नवरदेवाच्या ध्यानात आला. कारण आठ दिवसांनंतर नवरी मुलगी घरातून निघून गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. तेव्हा काहीतरी गौडबंगाल आहे, हे ध्यानात आलेल्या नवऱ्या मुलानं पोलिसात तक्रार दिली. मग हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.
बीड पोलिसांनी चार दिवसांपूर्वी रामकिशन जग्गनाथ तापडीया याला अटक केली होती. पोलिसांकडून रामकिशनची कसून चौकशी केली जात होती. या चौकशीतूनच पोलिसांनी बनावट नवरी असलेल्या तरुणीला आणि तिच्या आईलाही अटक केली आहे. या बनावट नवरीचं नाव रेखा असून तिनं अनेकांना फसवलं असण्याचा संशय पोलिसांना आहे.
लग्नाळू पोरांना आमीष दाखवून ही टोळी लुटत होती. गेवराई तालु्क्यातील तळणेवाडीच्या एका नवरदेवाची फसवणूक झाली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. लग्नाच्या आठ दिवसांनंतर नवरी मुलगी गायबच झाली. घरातून निघून गेलेली ही मुलगी पुन्हा न आल्यानं नवरदेवाला संशय आला.
त्यानंतर पोलिसांनी नवरदेवाच्या फिर्यादीवरुन नवरी मुलीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली. त्यानंतर बनावट नवरीचा शोध घेण्यात बीड पोलिसांना यश आलंय. आता बनावट नवरीसह तिच्या आईचीही कसून चौकशी केली जाते आहे.