Beed | इथल्या पुढाऱ्यांमुळे साखर कारखाना बंद, आमदार संदीप क्षीरसागरांचा आरोप, काका-पुतण्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
बीडमधील क्षीरसागर काका- पुतण्याचा वाद राज्याला सर्वश्रुत आहे. दोघेही काका-पुतणे कट्टर राजकीय वैरी आहेत. नुकताच गजानन सहकारी साखर कारखान्यावरून पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकांवर आरोप केले.
बीडः काका- पुतण्याचा वाद हा बीड जिल्ह्यासाठी काही नवीन नाही. परळी येथील मुंडे (Munde), तर वडवणी येथील सोळुंके आणि त्यानंतर बीडमधील क्षीरसागर कुटुंबाचे वाद चव्हाट्यावर आले आहे. काका जयदत्त क्षीरसागर यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर पुतणे संदीप क्षीरसागर यांनी वेगळी चूल मांडली. बीड विधानसभा मतदारसंघातील जनतेनी देखील संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांना स्वीकारत थेट आमदार पदावर बसविले. त्यानंतर एकानंतर एक अशा विविध निवडणुकांमध्ये संदीप क्षीरसागर गटाचा विजय होताना दिसत आहे. ग्रामीण भागात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजुरी सेवा सोसायटीवरही आमदार संदीप क्षीरसागर गटाचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे काका जयदत्त क्षीरसागर (Jaidatta kshirsagar) यांच्यावर टीका टीप्पणी करण्याची एकही संधी पुतणे सोडत नाही. नुकताच एका कार्यक्रमात त्यांनी गजाजन सहकारी साखर कारखाना बंद पडण्यासाठी इथले ‘पुढारी’ जबाबदार आहेत, असं वक्तव्य केलं.
कारखान्यावरून राजकारण पेटलं…
बीड मतदारसंघ आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून दिवंगत लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांनी राजुरी सर्कलमधील वंजारवाडी येथे गजानन सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती. मात्र क्षीरसागर यांच्या कौटुंबिक वादातून कारखाना डबघाईला आला. आज स्थितीला कारखाना बंद आहे. आणि याच कारखान्यावरून क्षीरसागर काका- पुतण्यात पुन्हा एकदा राजकरण पेटले आहे.
काय म्हणाले संदीप क्षीरसागर?
कारखाना सुरू असताना त्यातून फायदा घेण्याचे काम इथल्या पुढाऱ्यांनी केला. कारखान्याला मात्र काही दिलेच नाही. या पुढाऱ्यांची भाषणे प्लेन आणि सॅटेलाईटची असतात. मला चालू असलेली गोष्ट भेटलीच नाही, त्या पुढाऱ्यांचे नाव मी घेणार नाही अशा शब्दात पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. विविध विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी एका कार्यक्रमात ते बोलत होते.
एकाच बंगल्यात राहून कट्टर राजकीय वैरी….
क्षीरसागर काका- पुतण्याचा वाद राज्याला सर्वश्रुत आहे. दोघेही काका-पुतणे कट्टर राजकीय वैरी आहेत. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे एकाच बंगल्यात राहतात. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे संपूर्ण कुटुंबांचे स्वयंपाकगृह एकच आहे.
इतर बातम्या-