बीडच्या मुंडेंचा डामडौल! तलवारीने कापले 50 केक, जेसीबीतून फुलांची उधळण, जंगी बर्थ डे अडचणीत आणणार?
बीडचे वडवणी तालुक्यातील भाजप नेते बाबरी मुंडे हे तलवारीने केक कापण्याच्या प्रकारामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना काळात त्यांच्या वाढदिवसाला निघालेल्या जंगी मिरवणुकीतही नियमांचा भंग झाल्याचे दिसून आले आहे.
बीड जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा वाढदिवस आणि त्यात होणारा डामडौल हे समीकरणच झालं आहे. जिल्ह्याच्या (Beed BJP) वडवणी तालुक्यातील भाजप नेते बाबरी मुंडे (Babri Munde) याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. बाबरी मुंडे यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी तब्बल 50 केक मांडले होते. यावेळी तलवारीने केक कापून वाढदिवस मोठ्या डामडोलात साजरा करण्यात आला. तलवारीने केक कापतानाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. पण इथली तलवारबाजी बाबरी मुंडे यांना भोवण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याविषयी तक्रार केली असून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
पंकजा समर्थक राजाभाऊ मुंडे यांचे पुत्र!
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे खांदेसमर्थक म्हणून वडवणी येथील भाजप नेते राजाभाऊ मुंडे यांची ओळख आहे. त्यांचा मुलगा बाबरी मुंडे हे देखील भाजप नेते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस होता. नेत्यांचा वाढदिवस म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 50 केक आणले. बाबरी मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर पन्नास केक चक्क तलवारीने कापले.
जेसीबीतून फुलांचा वर्षाव
वाढदिवस साजरा झाल्यानंतर गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. आणि पुन्हा “डॉन” चित्रपटातल्या गाण्यावर भाजप नेते बाबरी मुंडे यांनी ठेका धरला. कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून ” अरे दिवानो मुझे पहचानो, कहांसे आया कौन हूं मैं” या गाण्यावर मुंडे यांनी थिरकायला सुरुवात केली. नेत्याचा सुप्पर डान्स पाहून कार्यकर्त्यांनी देखील ताल धरल्याचे पहावयास मिळाले. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले होते.
राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी, तलवार प्लास्टिकची- मुंडेंचा दावा
वाढदिवसानिमित्त होणारे डामडौल आणि बीड जिल्ह्यातील पुढारी हे एक समीकरणच बनले आहे. मात्र तलवारीने तब्बल 50 केक कापल्यामुळे बाबरी मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. बीडचे राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष सचिन जाधव यांनी कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान सदर तलवार ही प्लास्टिकची होती असा दावा भाजप नेते बाबरी मुंडे यांनी केला आहे.
इतर बातम्या-