Santosh Deshmukh Case : 16 दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाट, पोलिसांच्या तपासावर खासदार बजरंग बप्पा सोनवणेंचा संताप, केली ही मोठी मागणी
MP Bajrang Sonawane Demand : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 16 दिवस उलटूनही मुख्य आरोपी फरार असल्याने CID सह बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार आहेत. पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पत्रकार परिषदेत आरोपांच्या फैरी झाडल्या. इतकी निर्घृण हत्या करणारे आरोपी मोकाट कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी प्रकरणात मोठी मागणी केली आहे.
मे महिन्यापासून आरोपींचा त्रास
खासदार बजरंग सोनवणे यांनी हा खून एकाकी झाला नसल्याचे सूतोवाच केले. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. “संतोष देशमुख यांचा मर्डर झाला. या प्रकरणाची सुरुवात मे महिन्यात झाली. खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातून अनेक गोष्टी झाल्या. गुन्ह्यानंतर शिक्षा झाली नाही. हा विषय तिथेच थांबला. त्यानंतर २८ नोव्हेंबरला खंडणी मागण्यासाठी कुणाला तरी बोलावलं अशी माहिती आली. २९ नोव्हेंबरला शिंदे आणि खोपटे नावाचे अधिकारी गेले. खंडणी मागितली. त्यावेळी कामं बंद करा, नाही तर आम्हाला येऊन भेटा, अशी माहिती आहे. एवाडा कंपनीने काम बंद केलं नाही. त्यानंतर ६ डिसेंबर हा दिवस वेगळा दिवस आहे. देशाच्या दृष्टीने. आरोपींनी मस्साजोगच्या ऑफिसजवळ अधिकाऱ्यावर हल्ला केला. सोनावणे नावाच्या वाचमनलाही मारलं गेलं. त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. संतोष देशमुख यांना सेक्युरिटी गार्डने ही घटना सांगितलं. त्यांनी सरपंच देशमुखांकडे मदतीची मागणी केली”, अशी माहिती त्यांनी दिली.
पोलिसांवर कुणाचा दबाव?
खासदार सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांवर आरोपाच्या फेरी झाडल्या. घटनाक्रम सांगताना, 6 डिसेंबर रोजी काय झाले याची माहिती दिली. खंडणीसाठी आलेल्या आरोपींनी सरपंचाला मारहाण झाली. त्यानंतर काही लोकांनी मध्यस्थी केली. त्यानंतर आरोपी निघून गेले. त्यानंतर गार्ड आणि सरपंच देशमुखाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पण त्यांची फिर्याद घेतली नाही. तीन तास बसून ठेवलं. जातीवाचक शिवीगाळची फिर्याद घेतली नाही. थातूरमातूर फिर्याद घेतली. त्यानंतर ९ तारखेला आरोपींना अटक दाखवून जामीन दिली. बीड जिल्ह्यात अशी घटना का घडली. साधी तक्रार घ्या. जातीवाचक शिवीगाळची तक्रार घेऊ नका असा कुणाचा फोन आला? कुणी सांगितलं. याचा शोध घ्या. यात पीएसआय इन्व्हॉल्व होते का? याचा शोध घ्या. आरोपींना जामीन झाल्यावर पीएसआय त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये जातात हे सर्वांनी पाहिलं आहे, असे ते म्हणाले.
या प्रश्नांची उत्तर द्या
यावेळी सोनवणे यांनी या खूनामागील संपूर्ण घटनाक्रम सांगीतला. त्यांनी देशमुख यांना टॉर्चर करून मारलं. ५६ वण पोस्टमार्टममध्ये आलं आहे. त्याचा असा काय गुन्हा होता? असा सवाल विचारला. फक्त पोलीस तक्रार झाली होती का? मी सांगितलेला हा गुन्ह्याचा क्रम आहे. आधीच तक्रार घेतली असती आणि आरोपींचा शोध घेतला असता तर हत्या घडली नसती, असे ते म्हणाले.
९ तारखेला घटना घडल्यावर सरपंचाच्या भावाला कोण बोलला. बनसोड नावाचा पोलीस अधिकारी होता. त्यांना कुणाचा फोन आला. त्यांचा सीडीआर काढा. पाटील आणि महाजन या अधिकाऱ्यांना कुणाचा फोन आला. त्यांचा सीडीआर काढा. तसं केलं तरच गुन्हेगार सापडतील, असे ते म्हणाले.
पोलीस म्हणतात चौथा आरोपी पकडला. तर सत्ताधारी पक्षाच्या आमदार म्हणतात आरोपी सरेंडर झाले. यात तफावत काय. खरं काय. चौथा आरोपी खून आणि खंडणीच्याही गुन्ह्यात आहे, असा दावा त्यांनी केला.
मारेकर्यांना फाशी द्या. मास्टर माईंडलाही शिक्षा झाली पाहिजे. एक दोन आरोपींना अटक करून फायदा काय. अजून तीन आरोपी फरार आहे. त्यांना कधी अटक करणार आहात? असा सवाल त्यांनी केला.
आम्ही अंत्यविधी करणार नव्हतो. पोलीस म्हणाले दुपारपर्यंत वेळ द्या. आम्ही त्यांना वेळ दिला. आज १५ दिवस झाले. तीन आरोपी फरार आहेत. मग आम्ही अंत्यविधी करून चूक केली का? जे खंडणीत आहेत, तेच मर्डरमध्ये आहेत. त्यामुळे संपूर्ण केस क्लब करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.