बीडची बंदुकशाही, मंत्री धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांचे घेतले नाव, अंजली दमानिया यांचा आरोप काय? पिस्तुल परवान्यावरून मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
Santosh Deshmukh Case Anjali Damania : बीडचा बिहार होत असल्याचा विरोधकाकडून आरोप होत आहे, त्याचदरम्यान आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
बीडचा बिहार झाल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आले आहेत. बीडमधील काही घटनांनी या परिस्थितीला दुजोरा दिला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी, शनिवारी, 28 डिसेंबर रोजी बीड येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सर्वांनाच येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सांगितले. त्यांनी बीडमधील बंदुकशाहीविरोधात आवाज उठवला आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. काय म्हणाल्या दमानिया?
बीडची परिस्थिती गंभीर
आपण 2012-13 पासून बीडला जात असल्याचे सांगत, तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा दावा दमानिया यांनी केला. राजकारण्यांची तिथे गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या 28 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मागे उभं राहणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपण शनिवारी बीडमधील मोर्चात सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप
यावेळी त्यांनी धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार आहेत आणि ते मी दाखवले आहेत. या दोघांची दहशत,व्यवहार आणि बाकी सगळे धंदे एकत्र आहेत. जगमित्र शुगर नावाची कंपनी आहे त्यात त्याच्या नावावर जमीन आहे आणि त्याच कंपनीमध्ये राजश्री मुंडे या देखील सहभागी आहेत, असे त्या म्हणाल्या.
बीड जिल्ह्यात 1222 बंदुकीचे परवाने
एकट्या बीड जिल्ह्यात 1222 बंदुकीचे परवाने आहेत. हे परवाने कशासाठी दिले आहेत? असा सवाल त्यांनी केला. परवाना दिलेल्या या यादीत वाल्मिक कराड यांचं नाव दोनदा आले आहे. यादीत 250 क्रमांकावर वाल्मिक कराड यांचं नाव आहे V Karad या नावाने आहे तर 742 क्रमांकावर W Karad या नावाने त्यांचं नाव आहे. यातील एक परवाना रद्द करण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. पण ते अजून रद्द झालेले आहे की नाही हे माहीत नाही. जर अधिकृत बंदुक परवाने हे 1222 असतील तर बीड जिल्ह्यात अनधिकृत परवाने किती असतील? असा सवाल दमानिया यांनी केला.
धनंजय मुंडे हे अशा लोकांच्या पाठीमागे
परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील बंदुक परवान्याची माहिती त्यांनी दिली. त्यात परभणी जिल्ह्यात 32 बंदुक परवाने तर अमरावती जिल्ह्यात 243 बंदुक परवाने असल्याची माहिती त्यांनी दिली. मग एकट्या बीडमध्येच 1222 बंदुक परवाने कसे देण्यात आले, असा सवाल त्यांनी केला. कैलास फड आणि निखिल फड यांच्याकडे बंदुकीचे परवाने आहेत का? हे दोघे बाप लेक गुंड प्रवृत्तीचे आहेत. ही गंभीर परिस्थिती आहे. हे लोक हवेत गोळीबार करतात. धनंजय मुंडे हे या लोकांच्या पाठीशी आहेत, असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. वर्ष 2014 ते 2019 या पाच वर्षात ते राज्याचे तत्कालीन गृहमंत्री होते. आता पण त्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे. मग बीडमध्ये खरंच इतक्या बंदुकीची गरज आहे का? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला. बीडमध्ये बंदुक घेऊन व्हिडिओ तयार करणे ही फॅशन झाल्याचा आरोप त्यांनी केला.
धनुभाऊंच्या राजीनाम्याची मागणी
मराठा समाजाने आत्ता जात पात विसरून न्याय हक्कांसाठी एकत्र या, असे आवाहन दमानिया यांनी केले. मुंडे आणि कराड ही दोन माणसं दहशत निर्माण करून पैसा फक्त मिळवत आहेत. जितेंद्र आव्हाड सुद्धा बोलले आहेत की,वाल्मीक कराड याने सगळ्यात जास्त वंजारी लोकांना मारलं आहे, असे दमानिया म्हणाल्या. वाल्मिक कराड याने आत्म समर्पण करावं आणि धनजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.