Sarpanch Accident : संतोष देशमुखनंतर परळीत आणखी एका सरंपचाचा मृत्यू, राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले
Saundana Sarpanch Accident : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्य हादरले आहे. त्यातच परळीजवळ अजून एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे. परळीतील या घटनेने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्य हादरले आहे. तर आता परळीमध्ये औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवले आहे. या अपघातात सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात, त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
बीडमधील गुन्हेगारी, दहशत, खंडणीचे प्रकार राज्यभर गाजत आहे. बीड आहे की बिहार आहे, असा सवाल विरोधकच नाही तर सत्ताधारी बाकावरील आमदारांनी पण विचारला आहे. संतोष देशमुख यांची पवनचक्कीशी संबंधित एका वादातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. जिल्ह्यात एक मोठी गँगच हे काम करत असल्याचा सातत्याने विविध आक्रोश मोर्चातून करण्यात येत आहे. त्यात परळी येथील औष्णिक केंद्रातील राखेतून कोट्यवधींची उलाढाल समोर आणण्यात आली होती.
टिप्परने सरपंचाला उडवले
परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री अपघात झाला. सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले. त्यात क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तर आता या अपघाताने पुन्हा खळबळ उडाली आहे.
अपघात की घातपात?
राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीवरील सरपंचाला शनिवारी उडवले. हा अपघात भीषण होता. त्यात सरपंचाची दुचाकी चेंदामेंदा झाल्याचे समोर आले. ते रात्री त्यांच्या शेतातून घरी परतत होते. त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. मिरवड फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात सरपंच अभिमून्य क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला. हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर परळीतील राखेचे अर्थकारण पुन्हा चर्चेत आले आहे. या परिसरातील 8 ते 9 गावांना प्रदूषणाचा फटका बसला आहे. शेतातील पिकांसह ओढ्यातील पाणी सुद्धा राखमय झाले आहे. त्याविरोधात काही सरपंचांनी विरोध केला होता.