Beed | नगर परिषद निवडणुकीचं बिगुल वाजताच बीडमध्ये लढाई सुरु, क्षीरसागर काका-पुतणे भाऊबंधकीवर…
एरवी काका विरुद्ध पुतण्या झालेल्या राजकीय लढतीत यंदा पहिल्यांदाच दोन्ही सख्खी चुलत भावंड आमने-सामने आले आहेत. त्यामुळे बीडच्या राजकारणात एक नवीन पर्व पाहावयास मिळत आहे.
बीडः बीडच्या क्षीरसागर (Beed kshirsagar) काका-पुतण्याचे राजकीय वाद सर्वश्रुत आहे. नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच काका-पुतण्याची लढाई आता भाऊ बंधकीवर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) आणि शिवसेना नेते योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) या सख्ख्या चुलत भावंडांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. दोघा भावंडांत आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालीय. त्यामुळे या निवडणुकीचे महत्व वाढले आहे. एरवी काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला मात्र आता नगर परिषदेच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच सख्खे चुलत भावंड आमने-सामने पाहायला मिळणार आहेत. आचारसंहिता लागू होतात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जुळवा जुळव करण्यास सुरुवात केलीय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकासह चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांच्यावर तोफ डागली आहे. शहराच्या विकास कामात मी अग्रेसर असून काकांनी काहीच केलं नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या 52 जागावरदेखील राष्ट्रवादीचाच विजय होईल,असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
योगेश क्षीरसागरही मैदानात
दुसरीकडे शिवसेना नेते योगेश क्षीरसागर यांनी देखील बैठकीचा सपाटा सुरू केला. बीड शहराला बकाल करण्याचं काम आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं. कुठे विकास.. काम कधी केले.. त्यांनी समोर येऊन सांगावं, असं आव्हान योगेश क्षीरसागर यांनी चुलत बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांना दिले आहे. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एकदा समोरासमोर यावे चर्चा करावी आम्हीही तयार आहोत. एकदाच होऊनच जाऊ द्या असं सूचक वक्तव्य, शिवसेना नेते योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.
ऑगस्ट महिन्यात रणधुमाळी
ऑगस्ट महिन्यात नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर क्षीरसागर भावंडात पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळून आलाय. विकास कामाच्या श्रेयावरून दोन्हीही भावंडात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एरवी काका विरुद्ध पुतण्या झालेल्या राजकीय लढतीत यंदा पहिल्यांदाच दोन्ही सख्खी चुलत भावंड आमने-सामने आले आहेत. त्यामुळे बीडच्या राजकारणात एक नवीन पर्व पाहावयास मिळत आहे.