बीड (परळी) : नेता कितीही मोठा झाला, मंत्रीपदी गेला तरी मूळ गावात गेल्यावर आपली जुनी ओळख जपून ठेवण्याचा तो पुरेपुर प्रयत्न करतो. किंबहुना अनेक जण गावातील पारंपरिक उत्सव, सण, समारंभांना आवर्जून हजेरी लावतात. असाच अनुभव घेतलाय परळीतील (Parali, Beed) ग्रामस्थांनी. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा (Beed Guardian minister) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) हेदेखील आज अशाच एका प्रसंगात परळीत दिसून आले. निमित्त होतं परळीतील अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्याचं. या सोहळ्यात संपूर्ण गावाला पारावर बसून पंगतीत जेवण दिलं जातं. मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावत गावकऱ्यांसोबत काल्याचा प्रसाद घेतला.
वारकरी संप्रदायाने मुहूर्तमेढ रोवलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा महाराष्ट्राच्या खेडोपाडी पोहोचली आहे. ती अजूनही श्रद्धापूर्वक जोपासली जाते. या सप्ताहात लहान-थोर एकत्र येऊन हरिनाम गातात आणि एकत्रितपणे काल्याचा प्रसाद ग्रहण करतात. परळी तालुक्यातील नाथ्रा हे मंत्री धनंजय मुंडे यांचं मूळ गाव. आज या ठिकाणीदेखील पारंपरिक हरिनाम सप्ताहाचा शेवट झाला. काल्याच्या कीर्तनाने हा कार्यक्रम समाप्त झाला. या वेळी गावात पारावर बसून गावकऱ्यांसोबत पंगतीत बसून धनंजय मुंडे यांनी काल्याचा प्रसाद घेतला. यावेळी बालयोगी ह. भ. प. हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या अमृतवाणीतून भाविकांनी काल्याचा आंनद घेतला.
आपल्या परंपरा जोपासणे म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. त्यानुसार त्यांनी गावातील सप्ताहात हजेरी लावत हरिहर महाराजांचे दर्शन घेतले. एवढेच नव्हे तर गावातील मंदिरात पंगतीतही प्रसाद घेत जेवण केले. कितीही मोठा झालो तरी माझे पाय जमिनीवर रहावेत अशी प्रार्थना धनंजय मुंडे कायम करत असतात. त्याचीच प्रचिती आज आली. यावेळी माजी आमदार केशवराव आंधळे, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, पंचायत समिती सभापती पिंटू मुंडे, सरपंच सचिन मुंडे, सेवा सोसायटीचे चेअरमन अतुल मुंडे यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक आदींची उपस्थिती होती.
इतर बातम्या-