Beed | कांदा चिरताना आईच्या डोळ्यातलं पाणी असह्य झालं.. स्मार्ट चाकूच बनवला, बीडच्या Junior Scientist ची गोष्ट वाचाच
ओंकारच्या स्मार्ट चाकूवर एक हायस्पीड ड्रोन मोटर लावलेली आहे. त्यामुळे कांदा चिरताच त्यातील गंधक फॅनच्या मदतीने विरुद्ध दिशेला ढकललं जातं. त्यामुळे या द्रवाचा डोळ्यांशी संपर्कच होत नाही.
बीड | लहानपणापासून आईच्या अवतीभोवती खेळणाऱ्या ओंकारने आईला कांदा चिरताना (Onion) अनेकदा पाहिलं. पण मोठा झाला, सातवीत गेला तसा त्याला तिचं रडणं असह्य होऊ लागलं. हे दुःख त्याने आपल्या शिक्षकांशी (Teacher) शेअर केलं. कांदा चिरताना त्यातील रासायनिक पदार्थांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येत असेल तर आपण यावर निश्चितच उपाय शोधू शकतो, असं बोलून दाखवलं. ओंकारनं (Omkar) ही कल्पना ज्या शिक्षकांना सांगितली, ते शिक्षक विज्ञानाचे भन्नाट प्रयोग करणारे सर्जनशील व्यक्ती. मग काय जिज्ञासू वृत्तीचा विद्यार्थी आणि सर्वतोपरी मार्गदर्शन करणारा शिक्षक या दोघांच्या प्रयत्नांतून साकारला स्मार्ट चाकू. कांद्यावर चाकू मारताच त्यातून रासायनिक पदार्थ आईच्या डोळ्यापर्यंतच पोहोचू न देणारा चाकू यांनी तयार केला आणि पाहता पाहता देशासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग बनला. ही प्रेरणादायी कथा आहे, बीड तालुक्यातल्या कुर्ला गावातल्या ओंकारची.
बीडच्या ओंकारने बनवला स्मार्ट चाकू
ओंकार अनिल शिंदे, बीड तालुक्यातल्या कुर्ला गावातला शेजमजूर कुटुंबातला मुलगा. सातवीच्या शाळेत शिकणाऱ्या ओंकारने हा स्मार्ट चाकू बनवण्यासाठी शाळेतील भाऊसाहेब राणे या विज्ञानाच्या शिक्षकांची मदत घेतली. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येणार नाही, असं काही तरी करा, असं म्हणणाऱ्या ओंकारला गुरुजींनी साथ दिली. सातच दिवसात त्यांचा हा स्मार्ट चाकू तयार झाला.
स्मार्ट चाकू नेमकं काय करतो?
स्मार्ट चाकू काय करतो, हे पाहण्यापूर्वी कांदा कापताना डोळ्यात पाणी काय येतं, हे पहावं लागेल. कांदा आम्लयुक्त गुणधर्माचा आहे. त्याची पीएच व्हॅल्यू पाच ते सहाच्या दरम्यान असते. त्यामुळे कांदा कापतो तेव्हा त्यातून गंधकयुक्त द्रव्य बाहेर पडते. मुळात बाष्पनशील असल्यामुळे हवेत तरंगून गंधक डोळ्यापर्यंत पोहोचतो. डोळ्यातील पाण्याशी त्याचा संयोग झाल्यानंतर आम्ल तयार होतं. यामुळे अश्रू येतात. ओंकारच्या स्मार्ट चाकूवर एक हायस्पीड ड्रोन मोटर लावलेली आहे. त्यामुळे कांदा चिरताच त्यातील गंधक फॅनच्या मदतीने विरुद्ध दिशेला ढकललं जातं. त्यामुळे या द्रवाचा डोळ्यांशी संपर्कच होत नाही.
स्मार्ट चाकूसाठीचा खर्च फक्त 160 रुपये
विशेष म्हणजे ओंकारने तयार केलेल्या या स्मार्ट चाकूसाठी फक्त 160 रुपये खर्च आला आहे. एक हायस्पीड ड्रोन मोटर, छोटा फॅन, एक इंच प्लास्टिक पाइप, वायर, प्रेस बटण, युएसबी सॉकेट, 3.7 व्होल्ट रिचार्जेबल बॅटरी, एलईडी लाईट इत्यादी साहित्य यासाठी वापरले गेले. मोबाइलच्या चार्जरने किंवा सोलर प्लेटनेही तो चार्ज करता येतो.
राष्ट्रीय पुरस्कारांसाठी प्रदर्शनात निवड
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी ओंकारच्या स्मार्ट चाकूची निवड झाली आहे. महिनाभरातच दिल्लीतल्या प्रगती मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे. ओंकारला मार्गदर्शन करणाऱ्या भाऊसाहेब राणे या शिक्षकांच्या हातून याआधीही असे काही प्रेरणादायी विज्ञान प्रयोग घडले आहेत. आज ओंकारने हा प्रयोग यशस्वी करून दाखवल्याबद्दल त्यांना ओंकारचा अभिमान वाटतोय.
इतर बातम्या-