धक्कादायक | शाळेला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा रेडिएटर फुटला, Beed मध्ये दोन विद्यार्थी भाजले
खासगी संस्थाचालकांची बैठक घेऊन वाहन सुरक्षित असल्याच्या प्रमाणपत्राशिवाय परवानगी देण्यात येऊ नये. शिवाय प्रत्येक वाहनातील विद्यार्थ्यांचा विमा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
बीडः बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेला सोडणाऱ्या वाहनातील रेडिएटर (Radiator) अचानक फुटला. त्यामुळे वाहनात बसलेले दोन विद्यार्थी भाजले. कोरोना काळानंतर (Corona) दोन वर्षांनी शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करणारी वाहनेही (School van) सुरु झाली आहे. मात्र हे चालक जुनी वाहने वापरत आहेत. वाहतूक पोलिसांचे त्यावर कोणतेही नियंत्रण नाही, अशीच स्थिती आहे. बीडमधील सदर घटना माजलगावच्या लोणगावात काल घडली. इंग्रजी शाळेच्या वाहनात हा प्रकार घडला आहे. दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्या आणि अशी घटना घडली, त्यामुळे पालकवर्ग चिंतेत आहे.
स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांची कोंबाकोंबी
कोरोना महामारीत तब्बल दोन वर्ष बीड जिल्ह्यातील सर्वच शाळा महाविद्यालये बंद होती. मात्र सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा नव्याने सुरू झाल्या आहेत. दोन वर्षे घरात ऑनलाइन शिक्षण घेणारे विध्यार्थी आता शाळेत जात असल्याने गर्दीही कमालीची होतेय. याचाच फायदा विविध स्कुलबस चालकांनी घेतला आहे. एका स्कुल रिक्षामध्ये पाच मुलांची परवानगी आहे मात्र तिथं दहा ते पंधरा मुले कोंबली जात आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार खासगी वाहने शालेय विद्यार्थ्यांना ने आण करण्याचे काम करतात. विशेष म्हणजे एकाही वाहनात फर्स्ट एड बॉक्स किंवा अग्निशामक यंत्र नाही. त्यामुळे अपघात झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी संस्थाचालकांची बैठक घेऊन वाहन सुरक्षित असल्याच्या प्रमाणपत्राशिवाय परवानगी देण्यात येऊ नये. शिवाय प्रत्येक वाहनातील विद्यार्थ्यांचा विमा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
इतर बातम्या-