धनंजय मुंडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, खोटी अॅट्रॉसिटी लावली, पंकजा मुंडेंचा घणाघात!
पंकजा मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले होते की, 'पंकजा मुंडे यांनी माझी औकात काढली. माझं मंत्रीपद काढलं. हा माझा नव्हे तर माझ्या खात्याचा म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा आणि पर्यायानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे'.
बीडः केज नगरपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) अपमान केला, अशी टीका करणाऱ्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीच बाबासाहेबांनी दिलेल्या अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला, खोटी अॅट्रॉसिटी लावली, यापुढे बीड जिल्ह्यात असे प्रकार चालणार नाहीत, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी डॉ. बाबासाहेबांचा अपमान केलाय, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्याला आज पंकजा मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
काय आहे नेमकं प्रकरण?
केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत म्हटले होते की, सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद 32 व्या क्रमांकावर आहे. मी मंत्रीपदी असताना पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझं नाव होतं. 32 व्या नंबरपर्यंत आम्ही कधीही घसरलो नाहीत, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. मात्र याला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले होते की, ‘पंकजा मुंडे यांनी माझी औकात काढली. माझं मंत्रीपद काढलं. हा माझा नव्हे तर माझ्या खात्याचा म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा आणि पर्यायानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे’.
धनंजय मुंडे यांच्या उपरोक्त टीकेला उत्तर देतानाच पंकजा मुंडे यांनी आज त्यांच्यावर घणाघात केला. त्या म्हणाल्या, ‘ भाषण करताना बीड जिल्ह्याला पहिल्या चारात होते असं म्हणाले. तुमचा नंबर 32 वा आहे. जे आहे ते बोललो. आम्ही काही खिजवलं नाही. मी 32 वा नंबर म्हणलं. मी औकात म्हणलं नाही. ताकद म्हणलं. तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून पहा. औकात नाही म्हणाले. हे म्हणतात, आमची औकात काढली, आमचं मंत्रीपद काढलं. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असे आरोप झाले. मी 32 नंबरचं मंत्रीपद म्हणलं यात बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काय? बाबासाहेबांचा अपमान तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते करतात. खोट्या अॅट्रॉसिट्या करतात. कायदा वापरतात. पोलिसांना घरच्या कामासाठी ठेवल्यासारखे वापरून घेता, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान करताय. बाबासाहेब आंबेडकरांनी गरीबाला वाचवण्यासाठी जे अॅट्रॉसिटीची कवच कुंडलं दिली आहेत, त्याचा गैरवापर जर इथुन पुढे बीड जिल्ह्यात कुणी केला तर तो खपवून घेतला जाणार नाही’
करुणा शर्मांची पुन्हा एकदा पाठराखण!
शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा शर्मा यांनी परळीमध्ये पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. धनंजय मुंडे यांनीच खोट्या प्रकरणात करुणा मुंडे यांना गोवलं, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता. आज पुन्हा एकदा या प्रकरणावरून त्यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला. अशा प्रकारे खोट्या अॅट्रॉसिटी लावल्या, या कायद्याचा गैरवापर जर कुणी केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी केला.
इतर बातम्या-