मोठी बातमी समोर येत आहे, सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. उद्या सतीश भोसले विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार आहे. हरणाची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्यामुळे आता वन्यजीव प्रेमींकडून सतीश भोसले विरोधात उद्या उपोषण करण्यात येणार आहे. बीडवरून वन्यजीव प्रेमी मुंबईकडे रवाना झाले आहेत. सतीश भोसलेवर मकोका अतंर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे मागणी?
आम्ही बीड जिल्ह्यतून मुंबईकडे निघालो आहोत, सकाळी दहा वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. बाकीचे आरोपी अटक झाले पाहिजेत. या प्रकरणात एसआयटी लागली पाहिजे, वन्यजीवांचे मांस खाणाऱ्या गुन्हेगारांचं ब्लड सॅम्पल तपासण्यात यावं. 2000 पेक्षा जास्त लोक आझाद मैदानावर उपोषणाला दाखल होणार आहेत. माझे संपूर्ण कुटुंब भयभीत आहे, मी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दिला आहे. माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे, म्हणून मी एसपी साहेबाकडे संरक्षणाची मागणी केली आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणात माऊली शिरसाट यांनी दिली आहे.
दरम्यान आरोपीला अटक होऊन चार दिवस झाले, मात्र अजून त्याचं ब्लड सॅम्पल घेतलं नाही.
तपास अधिकारी बदलण्यात यावा, त्याच्यावर मकोका लावण्यात यावा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. सगळे वन्यजीव प्रेमी यात सहभाग घेणार आहेत, हे आमरण उपोषण आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत. यापूर्वी त्यांनी मरहाणीची घटना केली नव्हती. पण दबाव होता. पण आता ढाकणे परिवार समोर आला आहे. यांची परिसरामध्ये खूप दहशत आहे. त्यांच्यावर 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत, त्यांची खूप दहशत आहे, त्यांच्याविरोधात कोणी समोर येत नाही, असं देखील आंदोलकांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवर एक फोटो ट्विट केला होता. हा बंगला सतीश भोसलेचा आहे का असा सावल त्यांनी केला होता. या फोटोवर प्रतिक्रिया देताना हा बंगला आमचा नसून माझ्या चुलत दिराचा असल्याची प्रतिक्रिया खोक्या भोसलेच्या पत्नीनं दिली आहे.