Beed Indurikar : इंदुरीकर महाराज प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यावर संतापले! मग धनंजय मुंडेंनी जे म्हटलं, ते अखेर महाराजांना ऐकावंच लागलं, पाहा Video
Indurikar Maharaj News : परळीत घडलेला हा सगळा प्रकार चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओ धनंजय मुंडे हे कुठेत दिसत नसले, तरी त्यांच्या आवाज व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानचा कार्यक्रम चर्चेत आहे.
बीड : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Video) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महाराज कॅमेऱ्यामनवरच संतापल्याचं दिसून आलंय. चालू किर्तनादरम्यान, इंदुरीकर महाराज प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांवर (Camera of Media) कमालीचे संपातले होते. त्यांनी किर्तनात अभंग सादर करताना कॅमेऱ्यामनला खाली उतरण्याचा इशारा केला. कॅमेरे बंद व्हावेत, म्हणून त्यांनी थेट कॅमेरा ऑपरेट करणाऱ्याला दमही दिला. अखेर इंदुरीकर महाराजांना शांत करण्यासाठी आणि कॅमेरे सुरु राहावेत, यासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मध्ये पडावं लागलं. त्यानंतर अखेर हा वाद मिटला. बीडमध्ये एका किर्तन कार्यक्रमादरम्यान हा प्रसंग घडला. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं?
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचा समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी इंदुरीकर महाराज आणि प्रसारमाध्यमांचे कॅमेरे यांच्यात खटका उडाला.
‘कीर्तनातलं मधलं कुठलंतरी एक वाक्य उचलायचं आणि त्यानंतर कीर्तनातलं दुसरं कुठलंतरी वाक्य कापायचं, ते एकमेकाशी जोडून फेसबुक, युट्युबवर अपलोड करायचं, याचे परिणाम आम्हाला भोगायला लागतात’, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी संताप व्यक्त केला. फेसबुकवर, युट्युबवर टाकल्या जाणाऱ्या व्हिडीओवर त्यांनी आगपाखड करतानाच कॅमेरे बंद करा आणि खाली उतरा, असा इशारा त्यांनी दिली. जोपर्यंत कॅमेरामन खाली उतरत नाही, तोपर्यंत ते कॅमेरा ऑपरेट करणाऱ्यांना इशारा देतच राहिले होते.
तुम्ही जबाबदारी घेणार का व्हिडीओ अपलोड झाले तर, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी सवाल केला. त्यानंतर एक व्यक्ती इंदुरीकर महाराजांची समजूत काढण्यासाठी वर आली. पण तिचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. वर आलेल्या व्यक्तीनं मोबाईल काढून महाराजांना काहीतरी दाखवलं. त्यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या. पण तरिही महाराज काही ऐकले नाही. अखेर धनंजय मुंडे यांना मध्ये पडावं लागलं.
पाहा व्हिडीओ :
#Watch : बीडमध्ये चालू कार्यक्रमादरम्यान किर्तनकार इंदुरीकर महाराज कॅमेऱ्यामनवर भडकले, मग धनंजय मुंडेंनीही महाराजांना आरसा दाखवला, पाहा नेमकं काय घडलं? महाराज कॅमेऱ्याला इतके घाबरतात का? #Beed @dhananjay_munde pic.twitter.com/XJjvHctAMa
— Siddhesh Sawant (@ssidsawant) September 9, 2022
अखेर धनंजय मुंडे मध्ये पडले..
धनंजय मुंडे यांनी अखेर प्रसार माध्यमांचे कॅमेऱे त्यांना जे काम करायचं ते करतील, आपण अध्यात्माचं काम करावं, असं म्हटलं आणि कीर्तन पुढे सुरु ठेवण्यास विनंती केली. धनंजय मुंडे यांनी केलेल्या विनंतीनंतर इंदुरकीर शांत झाले. परळीत घडलेला हा सगळा प्रकार चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओ धनंजय मुंडे हे कुठेत दिसत नसले, तरी त्यांच्या आवाज व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानचा कार्यक्रम चर्चेत आहे. या कीर्तनादरम्यान, घडलेल्या या प्रकाराने इंदुरीकर महाराजांना कॅमेऱ्याची धास्ती का वाटतेय? असा सवाल उपस्थित केला जातोय.
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात मोबाईलवर व्हिडीओ काढण्यावर बंदी घातली होती. कीर्तनादरम्यान व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर टाकणाऱ्यांना त्यांनी आधीच इशारा दिलेला होता. त्यानंतर आता बीडच्या परळीतही असाच प्रकार घडल्यानं कीर्तनकार इंदुरीकर महाराज संतापल्याचं पाहायला मिळालंय.