मला चहूबाजूने घेरलंय, आता माझा…; नारायण गडावर मनोज जरांगेंचं मोठं विधान
Manoj Jarange Patil Dasara Melava : मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा सुरु आहे. बीडमधील नारायण गडावर मनोज जरांगे यांचं भाषण सुरु आहे. या भाषणात मनोज जरांगे यांनी मनातील भावना बोलून दाखवल्या. तसंच मराठा आरक्षणासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली आहे. वाचा...
आज दसऱ्याच्या निमित्त मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायण गडावर दसरा मेळावा आयोजित केला आहे. या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी मनातील सल बोलून दाखवली आहे. मला पूर्ण घेरलं आहे. मला संपवण्याचा घाट घातला आहे. मी गडावर खोटं बोलणार नाही. मला सांगावं लागतं. माझा त्रास माझ्या समाजाला नाही सहन होत नाही. माझ्या समाजाचा त्रास मला सहन होत नाही. मला होणाऱ्या वेदना मी चेहऱ्यावर आणत नाही . मला त्रास झाला तर समाज रात्र न् दिवस ढसाढसा रडतोय. माझ्या समाजाच्या लेकराला तुमच्यामुळे कलंक लागू देऊ नका. माझ्या समाजाची लेकरं हरवू देऊ नका. मला हे वचन द्या, असं जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगेंनी दंड थोपटले
एक गोष्ट लक्षात ठेवा. शेवटी आपल्यापुढे पर्याय नाही. मुख्य भूमिका तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. आचारसंहितेनंतर तुम्हाला मुख्य भूमिका सांगणार आहे. यांनी आपल्याला फसवलं. आता आपल्यापुढे एकच पर्याय. आचारसंहिता लागू द्यायची. नारायण गडावरून सांगतो, सरकारला सांगतो… सरकार… ओय सरकार… सुट्टी नाही भाऊ, असं म्हणत जरांगे यांनी दंड थोपटले. आचारसंहिता लागायच्या आत राज्यातील प्रश्नाची अंमलबजावणी करायची. नाही केली तर आचारसंहिता लागल्यावर सांगेल ते करायचं. एक विचारानं सांगा करणार का. कारण इथून मला तुम्हाला निर्णय देता येत नाही. यांचं सर्व बघायचं, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
जरांगे काय म्हणाले?
मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत अप्रत्यक्षपणे महत्वाचं विधान केलं आहे. यांना उखडून फेकावंच लागणार आहे. सुट्टी नाही. आपल्यावर डोळ्यादेखत अन्याय करत असेल तर समोरच्याला उखडून फेकावंच लागेल, त्याशिवाय सुट्टी नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागेल, असं जरांगे म्हणाले.
अनुदान नाही, पिकविमा नाही, मराठा आरक्षण नाही, धनगर आरक्षण नाही, कैकाडी, महादेव कोळी, लिंगायत यांना खाऊ दिलं जात नाही. मुस्लिम आणि दलितांना काही दिलं जात नाही. आपणच सर्वांसाठी झुंजत आहोत. आपणच सर्वांना न्याय देणार आहोत. काही लोक कशासाठी भिजत आहे. आपण जातीसाठी भिजत आहोत. काय होतं त्याला. याला शुभसंकेत समजा. आता तर गाडलेच समजा…, असं जरांगे म्हणालेत.