निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, शिंदे आणि ठाकरे या दोघांनाही…
पंकजा मुंडे चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. या निमित्ताने पंकजा मुंडे यांची पुन्हा तोफ धडधडणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हं दिलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची शिवसेना हीच ओरीजनल शिवसेना असणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. तब्बल 57 वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे घराण्याकडून शिवसेना आणि पक्ष चिन्हं हिसकावून घेण्यात आल्याने त्यावर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्रोटक प्रतिक्रिया व्यक्त केली. खरं तर आज शिवरात्रीचा दिवस असल्याने मी राजकीय बाईट देणार नाही. फक्त एवढंच सांगेल, ज्यांना मिळालं त्यांना आणि ज्यांना नाही मिळालं त्यांना दोघांनाही या निर्णयाला पुढे नेण्याची ईश्वर शक्ती देवो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी अत्यंत सावध आणि बॅलन्स प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचीही बाजू घेतलेली नाही. त्यामुळे पंकजा मंडे यांची प्रतिक्रिया ही चर्चेचा विषय ठरली आहे.
तोफ धडाडणार
दरम्यान, पंकजा मुंडे चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. या निमित्ताने पंकजा मुंडे यांची पुन्हा तोफ धडधडणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तीन दिवस मुक्काम
मी पुण्याला प्रचाराला जाणार आहे. कसब्यात हेमंत रासने आणि चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्यासाठी मी प्रचार करणार आहे. तीन दिवस मी प्रचारात असेल, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. या तीन दिवसात पंकजा मुंडे यांच्या भव्य सभा आणि रॅली होणार आहेत. तसेच त्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचना देणार असल्याचं सांगितलं जातं.
भेटीगाठी
पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही एकत्र सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या पुणे दौऱ्यात पंकजा मुंडे या खासदार गिरीश बापट आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचीही चर्चा आहे.
शिंदेच ठाणेदार
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल उद्धव ठाकरे गटाला धक्का देणारा मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या मतांच्या टक्केवारीनुसार हा निर्णय घेतला आहे.
या शिवाय शिवसेनेची घटनाच लोकशाही विरोधी असल्याचं सांगताना उद्धव ठाकरे यांनी घटना दुरुस्ती केल्यानंतरची माहिती निवडणूक आयोगाला दिली नसल्याचं आयोगाने म्हटलं आहे. या दोन्ही मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हिरावून घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्यापासून पर्याय राहिलेला नाही.